अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) हालचालींना सुरुवात झाली आहे. या संदर्भात आज, बुधवारी मुंबईत पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत तालुकानिहाय मतदारांच्या चाचपणीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी सुनेत्रा पवार चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध सध्या लागलेले आहेत. येत्या काही दिवसात बँकेची प्रारुप मतदार यादी जाहीर होईल. त्यासाठी सभासद संस्थांचे ठराव पूर्वीच मागवले गेले आहेत. त्याची छाननी सध्या सुरू आहे. त्याचबरोबर भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही जिल्ह्यातील सहकारातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राम शिंदे यांनी नगरमध्येच सुनेत्रा पवार यांच्याशी यांची बँकेच्या निवडणुकी संदर्भात भेट घेऊन चर्चा केली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक आज मुंबईत झाली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत (दक्षिण) व कपिल पवार (उत्तर) माजी संचालक अरुण तनपुरे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेची सत्ता पूर्वी राष्ट्रवादीकडे होती, त्यावेळी असलेल्या जागा व संचालक याबाबत चंद्रशेखर घुले यांनी माहिती दिली तसेच बँकेत सत्तांतर होऊन भाजपकडे गेलेले अध्यक्षपद, कर्डिले यांच्या निधनानंतर पुन्हा राष्ट्रवादीकडे आलेले अध्यक्षपद, प्रशासकाची नियुक्ती याबाबत घुले यांनी माहिती दिली.
बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी कोणत्या तालुक्यात पक्षाची ताकद आहे, यापूर्वी राष्ट्रवादीचे बँकेत वर्चस्व राहिली असल्यामुळे परत बँक पक्षाच्या ताब्यात येऊ शकते का, कोणत्या तालुक्यात पक्षाला मानणारे मतदार आहेत याबाबत चर्चा करण्यात आली. परिस्थितीनुसार उपमुख्यमंत्री सुनिता पवार ह्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले.
बैठकीत जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीबद्दल हरकती घेण्यात आल्या. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या नियुक्त करण्यात आल्या. जिथे महायुतीतील भाजप व शिंदे गटाचे आमदार आहेत तेथे पक्ष कार्यकर्त्याच्या नियुक्तीत दुर्लक्ष करण्यात आल्याकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
राम शिंदे यांच्या भेटीगाठीच्या दौऱ्याबद्दल प्रश्न
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनिता पवार ह्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याने भाजपचे दुसरे नेते राम शिंदे यांनी पालकमंत्र्यांना टाळून स्वतंत्रपणे सुरू केलेल्या भेटीगाठींबद्दल काय याचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. राम शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली होती असे असताना प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या बैठकीत वेगळाच घाट घातला जात असल्याचे दिसत आहे.
