अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत आता उर्वरित १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २७ उमेदवारांसाठी उद्या, सोमवारी मतदान होत आहे. संचालक पदाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, त्यांचे चिरंजीव, साखर कारखानदार रिंगणात असल्याने राज्याचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

निवडणूक होत असलेल्या १० जागांमध्ये भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची युती ८ जागा, शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके व शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ७ जागा तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट कर्जतमधील १ जागा लढवत आहे. यापैकी कोणत्याही पॅनलने अकोल्यात उमेदवार दिलेला नाही, तेथे स्वतंत्र लढत होत आहे. विखे- थोरात युतीने यापूर्वीच बिनविरोध झालेल्या १० जागा मिळवून बँकेवर वर्चस्व निर्माण केले आहे. बिनविरोधची एक जागा राम शिंदे गटाला मिळाली आहे.

लढत होत असलेल्या जागांपैकी सेवा संस्थेच्या अकोले, कर्जत व पारनेर येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे. अकोल्यात आमदार डॉ. किरण लहामटे विरुद्ध जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे, कर्जत मध्ये अप्रत्यक्षपणे राधाकृष्ण विखे विरुद्ध राम शिंदे अशी तर पारनेर मध्ये अप्रत्यक्षपणे राधाकृष्ण विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होत आहे राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे विरुद्ध नगराध्यक्ष सत्यजित कदम, शेतीपूरकमध्ये आमदार आशुतोष काळे विरुद्ध सुधीर म्हस्के अशी लढत होत आहे.

याशिवाय महिला मतदारसंघातून हर्षदा काकडे, अनुराधा नागवडे, संगीता जयंत वाघ, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे व पुष्पा गायकवाड रिंगणात आहेत. ओबीसी मतदारसंघात कारभारी जावळे विरुद्ध जालिंदर वाकचौरे, अजिनाथ हजारे, शिवदास गुंजाळ, कडूचंद शेटे तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून बँकेचे माजी संचालक गणपतराव सांगळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे यांचे चिरंजीव ऋषिकेश ढाकणे व सुभाष गीते रिंगणात आहेत.

बिनविरोध निवडून आलेले

यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले- आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, माजीमंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते बिपिन कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, माजी संचालक करण ससाने, रणजीत देशमुख, दत्तात्रय पानसरे, सचिन घुमरे, सचिन जगताप.

मतदान प्रक्रियेसाठी २१९ अधिकारी कर्मचारी नियुक्त

जिल्ह्यातील एकूण ३३ मतदान केंद्रावर २१९ अधिकारी व कर्मचारी तर मतमोजणीसाठी ५८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी ६९ पोलीस अधिकारी व कर्मचारी तर मतमोजणी ठिकाणी १० पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

३८३७ मतदार

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७१५ मतदार आहेत. कोपरगावमध्ये ५२९, नगरमध्ये ३९१, श्रीगोंद्यात २९९ मतदार आहेत. नेवासामध्ये २४६, अकोले २३१, पारनेर २२७, कर्जत १६८, श्रीरामपूर १४७, पाथर्डीत १३१, शेवगाव ११७ व जामखेडमध्ये ११५ मतदार आहेत. सेवा संस्था मतदारसंघातील मतदारांना संबंधित तालुक्यातीलच मतदार मतदान करतील तर उर्वरित सात जागांवरील उमेदवारांसाठी जिल्हाभरातील मतदार मतदान करतील.