अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्थांच्या कर्जत, अकोले व पारनेर मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. याशिवाय महिला मतदारसंघासह अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातही अटीतटीची लढत अपेक्षित आहे. दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चुरशीच्या लढती ठिकाणचे मतदार उमेदवारांनी सहलीवर नेले आहेत. आता थेट ते मतदानाच्या वेळीच परततील.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या पॅनलविरोधात भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३ तर शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके व शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
बिनविरोध झालेल्या ११ पैकी १० जागा विखे-थोरात गटाला तर १ जागा सभापती राम शिंदे गटाला मिळाली आहे. त्यामुळे बँकेवर विखे-थोरात यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. विखे-थोरात युतीमध्ये थोरात गटाचे ६ तर विखे गटाचे ४ बिनविरोध ठरले आहेत. आता संचालक मंडळाच्या उर्वरित १० जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कर्जतमध्ये सभापती राम शिंदे समर्थक ज्योती प्रकाश शिंदे व विखे समर्थक अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ आमनेसामने आले आहेत. विखे- थोरात युतीने राम शिंदे समर्थकाविरुद्ध पॅनलचा उमेदवार देणे टाळले असले तरी विरोधी उमेदवार तुषार पिसाळ हे विखे समर्थकच असल्याने निवडणूक समर्थकांऐवजी थेट राधाकृष्ण विखे व राम शिंदे यांच्यातच अप्रत्यक्षपणे लढली जाणार आहे.
अकोल्यात अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तेथे माजी आमदार वैभव पिचड व अमित भांगरे यांच्या समर्थकांची मते निर्णायक ठरतील. सलग दहा वर्षे संचालक पदी राहिल्याने सिताराम गायकर यांना निवडणूक लढवण्यावर बंधन आले आहे. त्यांनी कनेच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे. पारनेरमध्ये खासदार लंके यांच्या विरोधात विखे समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत. त्यामुळे लंके विरुद्ध विखे अशीच लढत होणार आहे. लंके व विखे या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.
महिला मतदार संघात हर्षदा काकडे, अनुराधा नागवडे व संगीता वाघ यांच्या लढतीची चुरस आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातही माजी आमदार वैभव पिचड व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रसाद लोखंडे यांच्यातील लढत प्रभावी ठरेल.
निवडणुकीत तालुकातालुक्यात मोजकेच मतदार असल्यामुळे अटीतटीच्या लढतीच्या ठिकाणच्या उमेदवारांनी आपले समर्थक मतदार सहलीवर पाठवले आहेत. कर्जत व जामखेडचे मतदार पूर्वीच सहलीवर गेले आहेत. त्यातील जामखेडची जागा बिनविरोध ठरली असली तरी सहलीवरील मतदार अद्याप परतलेले नाहीत. पारनेरमधील आपले समर्थक मतदार ही खासदार लंके यांनी सहलीवर पाठवले आहेत. विखे- थोरात पॅनलच्या वतीने माजी खासदार व बिनविरोध ठरलेले उमेदवार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांचे तालुकानिहाय मेळावे घेऊन विजयाचे आवाहन केले जात आहे.
संगमनेर, कोपरगाव, नगरमधील मते निर्णायक
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७१५ मतदार आहेत. त्याखालोखाल कोपरगावमध्ये ५२९, नगरमध्ये ३९१, श्रीगोंद्यात २९९ मतदार आहेत. नेवासामध्ये २४६, अकोले २३१, पारनेर २२७, कर्जत १६८, श्रीरामपूर १४७, पाथर्डीत १३१, शेवगाव ११७ व जामखेडमध्ये ११५ मतदार आहेत. सेवा संस्था मतदारसंघातील मतदारांना संबंधित तालुक्यातीलच मतदार मतदान करतील तर उर्वरित सात जागांवरील उमेदवारांसाठी जिल्हाभरातील मतदार मतदान करतील.
३३ मतदान केंद्र
मतदानासाठी जिल्ह्यात ३३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. अकोल्यात जि. प. शाळा, जामखेडमध्ये मुलींची जि. प. शाळा, कर्जतमध्ये मुलांची जि. प. शाळा, कोपरगावमध्ये नगरपालिका शाळा, नगर शहरात भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, नेवासा खुर्द जि. प. शाळा, पारनेरमध्ये सुपे रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, पाथर्डीत जि. प. शाळा, राहतामध्ये सेंट जॉन्स स्कूल, राहुरीत भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय, संगमनेरमध्ये भिकाजी मेहेर विद्यालय, शेवगावमध्ये आदर्श विद्यालय, श्रीगोंद्यात महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीरामपूरमध्ये दादा जोशी नवीन मराठी शाळा येथे मतदान केंद्र आहेत.
