अहिल्यानगर: शहराच्या मूळ हद्दीचा तिसरा सुधारीत प्रारूप विकास आराखडा व वाढीव हद्दीचा पहिला सुधारीत प्रारूप विकास आराखडा एकत्रितपणे आज, गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी तो खुला केल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. या आराखड्यावर नागरिकांना ९ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. यासाठी मनपा आयुक्त कार्यालय तसेच सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर येथील नगररचना उपसंचालक कार्यालयात (डीपी युनिट) हरकती दाखल व्यवस्था केल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
प्रस्तावित आराखड्यानुसार शहराचे एकूण नियोजन क्षेत्र ६८०९.०७ हेक्टर असून, त्यात विकासयोग्य क्षेत्र ६०८२.१५ हेक्टर (८९.३२%) आणि अविकासनीय क्षेत्र ७२६.९२ हेक्टर (१०.६८%) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. विकासयोग्य क्षेत्रात निवासी वापरासाठी सर्वाधिक ३९४६.०६ हेक्टर (५७.९५%) जमीन प्रस्तावित असून, याद्वारे वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यास प्राधान्य दिले आहे. याव्यतिरिक्त वाहतूक व दळणवळणासाठी १२८१.२९ हेक्टर, सार्वजनिक व निमसार्वजनिक वापरासाठी ३२६.५६ हेक्टर, मनोरंजनात्मक वापरासाठी २८९.५० हेक्टर आणि औद्योगिक तसेच व्यापारी वापरासाठी अनुक्रमे ८०.५७ व ५३.१९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. अविकासनीय क्षेत्रात प्रामुख्याने कृषी जमीन (४७८.४८ हेक्टर), जलस्रोत (१८४.२६ हेक्टर) आणि वनीकरण (६४.१८ हेक्टर) यांचा समावेश आहे.
सर्वाधिक आरक्षणे क्रीडांगणासाठी
प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यात शहराच्या भविष्यातील वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी एकूण ४७९ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ ४१५.१५ हेक्टर इतके आहे. यामध्ये क्रीडांगणासाठी सर्वाधिक ९० आरक्षणे (१०३.४३ हेक्टर), त्याखालोखाल उद्यान व बगीच्यासाठी ८४ आरक्षणे (६८.४४ हेक्टर) प्रस्तावित आहेत. याशिवाय भाजी मंडई, खरेदी केंद्र व बाजारासाठी ६० आरक्षणे (११.०० हेक्टर), शैक्षणिक सुविधांसाठी ४० आरक्षणे (२६.२२ हेक्टर), तर रुग्णालये व आरोग्यसेवेसाठी २८ आरक्षणे (१०.६४ हेक्टर) ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहनतळासाठी ३२ आरक्षणे, महापालिका प्रयोजनासाठी ३८ आरक्षणे आणि मैला शुद्धीकरण (४ आरक्षणे) व घनकचरा व्यवस्थापनासाठी (१ आरक्षणे) स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून वाहनतळासाठी ३२ जागांवर आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
व्यापारी व औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र तरतूद
सुधारीत विकास आराखडा शहरी विकासाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला असून, त्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक उपक्रमांसाठी व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांची स्वतंत्र तरतूद केल्याने भविष्यात शहरात रोजगार निर्मितीला आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, सार्वजनिक उपयोगिता, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि मनोरंजनाच्या जागांचे योग्य नियोजन करून शहरातील राहणीमानात सुधारणा करणे आणि शहर रचनेची दीर्घकालीन सक्षमता बळकट करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका
