अहिल्यानगर: श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने याला प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे धर्मवीर गडाच्या संवर्धनाच्या कामाला आता गती मिळणार आहे.

धर्मवीर गड गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे संवर्धन, जतन आणि विकास व्हावा, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना साजेसे स्मारक उभारले जावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समिती (नाशिक) अंतर्गत प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी उपलब्ध निधीतून पेडगाव येथील धर्मवीर गड कामाचा समावेश करण्यात आला व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

धर्मवीर गड अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पेडगावमध्ये भीमा नदीच्या काठी आहे. हा परिसर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी अतूट नाते सांगणारा ऐतिहासिक वारसा आहे. संगमेश्वर येथे पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पेडगावच्या गडावर आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या स्मृतींशी जोडलेल्या या भूमीचे जतन करणे ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. धर्मवीर गडाच्या विकासासाठी आराखडा तयार केला जाणार असून, गडाला ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

धर्मवीर गडाच्या जतन-दुरुस्तीमुळे गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्मारकाच्या उभारणीच्या दृष्टीनेही हा निधी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. येथून जवळच अष्टविनायकपैकी एक सिद्धटेक गणपती मंदिर आहे. धर्मवीर गडाच्या विकासामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.