अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेनंतर, सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदांसाठी बँक दरवर्षी भोजनाची व्यवस्था करते. यंदाही अशीच व्यवस्था करण्यात आली होती. यंदा हा ठेका घेणाऱ्या अन्न पुरवठादाराकडे (केटरर्स) अन्न व्यवसायाचा परवाना नसल्याचे अन्न व औषध प्रशासना विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे या केटरर्सला अन्न प्रशासनाने नोटीस बजावून अन्न व्यवसायाचा परवाना प्राप्त करेपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे
अहिल्यानगर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल, सोमवारी दुपारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. उपस्थित राहणाऱ्या सभासदांसाठी बँकेपासून जवळच असलेल्या केशर गुलाब मंगल कार्यालयात (आनंदधाम रस्ता) येथे दुपारी भोजनाची करण्यात आली होती. या भोजन व्यवस्थेचा ठेका अहिल्यानगर तालुक्यातील शेंडी येथील एका केटरर्सला देण्यात आला होता. सुमारे २ हजार लोकांसाठी भोजन तयार करण्याचे काम संबंधित केटरर्सकडून करण्यात येत होते.
दरम्यान, संबंधित केटरर्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गौरव जगताप यांना मिळाली. तसेच, सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ च्या संकेतस्थळावर कोणतीही नोंद न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था केल्याचे अन्न सुरक्षा पथकाच्या निदर्शनास आले.
त्यानंतर सहायक आयुक्त जगताप यांनी अन्न सुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला यांच्यासह संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान केटरर्सकडे अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत आवश्यक असलेला अन्न व्यवसाय परवाना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली.
सुमारे दोन हजार लोकांच्या भोजन व्यवस्थेचे कंत्राट अशा प्रकारे परवान्याशिवाय स्वीकारण्यात आल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली. सहायक आयुक्त जगताप यांनी संबंधित केटरर्सला नोटीस बजावून ७ दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अन्न व्यवसायाचा आवश्यक परवाना प्राप्त होईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या केटरर्सकडे अन्न व्यवसायाचा परवाना नव्हता मात्र बँकेनेही ठेका देताना या केटरर्सकडे असा परवाना आहे का याची खातरजमा केली नसल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली असल्याने बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे. प्रशासक पदाची सूत्रे सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांच्याकडे आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
