अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल ३६९ इतक्या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, सोमवारी अखेरची मुदत होती. उमेदवारीसाठी एकूण ९०३ अर्जांची विक्री झाली होती होती. उमेदवारी दाखल करताना अनेकांनी शक्तीप्रदर्शन केले.
आज अखेरच्या दिवशी माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, माजीमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची जावई रणजीतसिंह देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू नीरज मुरकुटे, माजी संचालक अमित भांगरे, शिवसेना (शिंदे गट) अरुण मुंडे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास गोल्हार अशा अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले. खासदार निलेश लंके, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार वैभव पिचड यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. समर्थकांनी इच्छुक उमेदवारांचे फलक उंचावत घोषणाबाजीही केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे काम पाहत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून तालुका निबंधक रावसाहेब खेडकर व देविदास घोडेचोर काम पाहत आहेत.
सर्वाधिक महिला मतदारसंघातून ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तेथे दोन संचालक निवडून द्यायचे आहेत. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्राथमिक सेवा संस्था मतदारसंघात अकोल्यात १९, जामखेड ६, कर्जत १३, कोपरगाव ६, नगर ६, नेवासा ४ (चारही अर्ज माजीमंत्री गडाख यांचे), पारनेर १०, पाथर्डी ६, राहाता ६, राहुरी ७, संगमनेर ४, शेवगाव ४, श्रीगोंदे १६, श्रीरामपूरयांच्या ५, शेतीपूरक ३६, बिगरशेती ५४, महिला ६३, अनुसूचित जाती- जमाती २५, ओबीसी ५३ व विजाभज- विशेष मागास प्रवर्ग २६ अर्ज दाखल झाले आहेत.
बिनविरोधसाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न- आमदार जगताप
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील, असे आमदार संग्राम जगताप यांनी आज माजी खासदार सुजय विखे व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. बिनविरोध निवडीसाठी यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सुजय विखे यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक झाली. बिनविरोध निवड करताना बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करण्यात आल्याचा इन्कार त्यांनी केला.
शिवसेनेचा विचार करा- माजी खासदार लोखंडे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमचे समर्थन असले तरी शिवसेनेला (शिंदे गट) विचारात घेतले जावे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमचा विचार न झाल्यास पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. पक्ष पदाधिकाऱ्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार अमोल खताळ उपस्थित होते, मात्र खासदार भाऊसाहेब वाकचौरे अनुपस्थित होते.
