अहिल्यानगर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी साखर कारखानदार एकवटल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विस्थापितही एकवटले असून खासदार नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली विस्थापितांनी पूर्ण ताकदीनिशी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी आघाडीही आकारास येऊ लागली आहे. या आघाडीने जिल्हा बँकेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे राज्य सरकारमधील सहभागी महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेनाही (शिंदे गट) विरोधी आघाडीला जाऊन मिळाला आहे. मात्र या गटातील विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. शिंदे गटाच्या वतीने जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाही खासदार वाकचौरे अनुपस्थित राहिले होते. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे पक्षाचे जिल्ह्यातील आमदार विठ्ठलराव लंघे (नेवासा) व अमोल खताळ (संगमनेर) यांच्या पुढेही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

विरोधी पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने प्राथमिक बैठक आज, गुरुवारी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार लंके, माजी खासदारध्यक्ष लोखंडे यांच्यासह माजी आमदार राहुल जगताप, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट), जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे, माजी सदस्य शिवशंकर राजळे, माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा बँकेचे माजी संचालक अमित भांगरे, पूर्वाश्रमीचे थोरात समर्थक बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब विखे, सुधीर मस्के, एकनाथ घोगरे, अमृत धुमाळ, किरण कडू, रावसाहेब खेवरे, किसनराव लोटके, रामेश्वर निमसे, अंकुश उगले, साहिल खर्डे आदींसह सुमारे ४० हून अधिक इच्छुक उमेदवार तसेच मतदारही उपस्थित होते.

या बैठकीत संदर्भात माहिती देताना जिल्हाध्यक्ष काकडे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य शेतकरी सभासदांची तशी भावना असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. बँकेच्या निवडणुकीसंदर्भात समविचारी उमेदवारांना सोबत घेऊन लढण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हा बँक खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे.

या बँकेच्या सेवेचा लाभ त्यांनाच झालं पाहिजे. मात्र आज ही बँक शेतकऱ्यांची राहिली नसून ठराविक कारखानदारांची व भांडवलदारांची झाली आहे. त्यामुळेच बँकेची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा घाट घालण्यात आला. मात्र त्याची प्रतिक्रिया उमटून विक्रमी ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननीनंतर ही संख्या २३९ राहिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑक्टोबरपर्यंत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा यासाठी साम- दाम- दंड- भेद नितिचा अवलंब होऊ लागला आहे.