कर्जत: भाजपअंतर्गत परस्परांचे विरोधक असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील दुष्काळी आढावा बैठकीसाठी व्यासपीठावर एकत्र आले मात्र जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील त्यांचा दुरावा कायम असल्याचेच यावेळी स्पष्ट झाले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री विखे व सभापती शिंदे यांच्यामध्ये परस्परांवर टीकाटिप्पणी, शहकटशह सुरू आहे. त्यातून दोघांमधील दुरावा उघड झालेला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून परस्परांवर शरसंधान केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल, गुरुवारी जामखेडमधील दुष्काळी बैठकीसाठी विखे व शिंदे एकत्रितपणे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे दोघांमध्ये कोणता संवाद होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र बैठकीत दोघांनी बँकेच्या निवडणुकीबद्दल कोणतेही सूतोवाच केले नाही. या विषयावर त्यांनी परस्परांशी संवादही साधला नाही.

मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे व त्यांचे विरोधक काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक बैठक झाली. मात्र या बैठकीला सभापती राम शिंदे अनुपस्थितीत होते. बिनविरोधच्या प्रयत्नांसाठी झालेल्या बैठकीची पालकमंत्री विखे यांनाच माहिती नव्हती, याकडे सभापती राम शिंदे यांनी लक्ष वेधत टीकाटिप्पणी केली होती. त्यामुळेच जामखेडमध्ये होणाऱ्या विखे व शिंदे यांच्या एकत्रित बैठकीबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात होती. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ देत विखे व थोरात यांनी एकत्र बैठक घेतली होती.

बैठक संपल्यानंतर राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विखे यांच्याशी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले. विखे यांनीही बँकेच्या निवडणुकीवर बोलण्यास नकार दिला.

बैठकीत पालकमंत्री विखे यांनी दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले. समाधानकारक माहिती न देता आल्याने गटविकास अधिकारी शुभम जाधव यांची पालकमंत्र्यांनी कानउघडणी केली. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेडला मिळावे अशी मागणी राम शिंदे यांनी केली. पिक विमा, वीज व जलजीवन मिशनच्या प्रश्नावरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, आमदार सुनील कर्जतकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.