कर्जत: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत ठराव असलेल्या मतदारांच्या बैठका घेतल्यानंतर मतदारांना सहलीसह देवदर्शनासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

कर्जत शहरातील महाराजा मंगल कार्यालयात आज, बुधवारी कुळधरण व राशीन गटातील मतदारांची सभापती राम शिंदे यांनी बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीला सुमारे २२ मतदार उपस्थित होते, अशी माहिती मिळाली. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडी, संभाव्य समीकरणे आणि पुढील रणनीतीबाबत मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे समजते.

बैठकीनंतर उपस्थित मतदारांना वातानुकूलित वाहनांमधून सहलीसह देवदर्शनासाठी पाठवल्याची माहिती मिळाली. काल, मंगळवारी कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील अलंकार मंगल कार्यालयात सुमारे ३३ मतदारांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर या मतदारांनाही सहलीसह देवदर्शनासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.कर्जत तालुक्यात सेवा सहकारी मतदारसंघातील एकूण ७५ मतदारांपैकी ५७ मतदार राम शिंदे यांच्या संपर्कातून सहलीला गेल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. या संख्येमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील मतदारांचे गणित कोणत्या दिशेने झुकत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच राम शिंदे यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज घेतल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडमधील त्यांची सक्रियता अधिक चर्चेत आली आहे. कर्जत ता लुक्यातील सेवा सहकारी मतदारसंघातून राम शिंदे यांच्या गटाकडून अंतिम उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांची या निवडणुकीतील भूमिका काय राहणार, याकडेही सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडमध्ये सुरू झालेल्या या हालचाली आगामी काळात आणखी वेग घेण्याची शक्यता असून, ५७ मतदार आणि उमेदवार कोण?’ या दोन मुद्द्यांभोवती कर्जतच्या सहकार राजकारणाची चर्चा रंगत आहे.