अहिल्यानगर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काल, रविवारी बैठक झाली. मात्र दुष्काळी परिस्थिती पाहून निवडणुकीत आपला स्वतःचा ‘अजेंडा’ कोणी राबवत असेल तर ते गैर आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जावा, बँकेचे हित जोपासले जावे, यासाठी विश्वासार्ह सांचालक मंडळ बँकेवर असावे, अशी अपेक्षा भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणारे सर्वांशी संवाद साधून योग्य निर्णय घेतील. त्यासाठी त्यांनी सर्वांची सहमती मिळवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी संगमनेरमध्ये बैठक घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्राथमिक बैठक घेतली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती शिंदे बोलत होते.
सभापती शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपली सक्रिय भूमिका राहील, असे आपण पूर्वीच जाहीर केले होते. त्या दृष्टीने कर्जत व जामखेड तालुक्यातून माझ्या नावाचा ठरावही करण्यात आला. मी जरी वरिष्ठ पदावर असलो तरी बँकेमध्ये वरिष्ठ असणाऱ्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी गाठीभेटी घेतल्या. सहकाराच्या निवडणुकीत प्राप्त परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे.
काल, संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीसाठी मला निरोप देण्यात आला होता. परंतु या बैठकीचा ‘अजेंडा’ काय होता याची आपल्याला कल्पना नव्हती. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळवणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध व्हावी असे सुतवाच केले आहे. देशात आणि राज्यात दुष्काळाचे सावट आहे. माझी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल बैठक घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र दुष्काळाचे कारण सांगून आपला स्वतःचा ‘अजेंडा’ कोणी राबवू नये, अशी ही अपेक्षा सभापती शिंदे यांनी व्यक्त केली.
कर्जत-जामखेडकडे रोहित पवारांचे दुर्लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी माझ्यामुळे राम शिंदे यांना सभापती पद मिळाले अशी, टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राम शिंदे म्हणाले अशा शिफारसीने कोणी नियुक्त झाले असते तर त्यांच्याकडे रांगा लागल्या असत्या. कर्जत-जामखेडमध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना रोहित पवार आपण मतदारसंघात सहा महिने फिरकलो नाही, अशी कबुली देत आहेत. दुष्काळी परिस्थितीत सर्वात प्रथम आपण कर्जत-जामखेडमध्ये बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना संदर्भात निर्णय घेतले. रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.
