अहिल्यानगर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर आणखी ३ जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर आहे. तोपर्यंत आणखी किती जागा बिनविरोध होतात व किती जागांसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट होईल. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी आता नेत्यांची कसोटी लागेल.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी वैध उमेदवारांची यादी आज, बुधवारी प्रसिद्ध केली. काल, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी व हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर वैध अर्जांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली त्यातून ही बाब स्पष्ट होत आहे.
बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये ठाकरे गटाचे माजीमंत्री शंकरराव गडाख (नेवासे, सेवा सोसायटी) व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख (संगमनेर, सेवा सोसायटी) यांचा समावेश आहे. त्यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज आहेत तर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे (राहाता, सेवा सोसायटी), अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले किंवा त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले (शेवगाव, सेवा सोसायटी) व भाजपचे माजी आमदार विवेक कोल्हे किंवा त्यांचे वडील बिपीन कोल्हे (कोपरगाव, सेवा सोसायटी) यांचा बिनविरोध निवडीच्या मार्गावर आहेत.
राहातामध्ये माजी खासदार विखे व त्यांचे समर्थक भास्कर निवृत्ती खर्डे अशा दोघांचेच अर्ज शिल्लक आहेत. खर्डे हे प्रवरा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातूनच विखे समर्थकांनी बिनविरोध निवडीचा नगरमध्ये जल्लोष करत फटाके फोडले. शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले व त्यांच्या पत्नी राज्यश्री घुले अशा दोघांचेच अर्ज शिल्लक आहेत. चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे तर राजश्री घुले यांची उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. कोपरगावमध्ये बिपिन कोल्हे व त्यांचे चिरंजीव आमदार विवेक कोल्हे अशा दोघांचे अर्ज शिल्लक आहेत. त्यातील बिपिन कोल्हे यांचा अर्ज मागे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. आमदार कोल्हे हे बँकेचे माजी संचालक आहेत.
बँकेच्या निवडणुकीसाठी ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरवणे किंवा हरकतीमुळे बाद ठरवणे तसेच एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणे अशा विविध कारणांमुळे आता एकूण २३९ उमेदवार राहिले आहेत. उमेदवारी अर्ज आजपासून मागे घेतले जाण्यास सुरुवात झाली आहे. ती प्रक्रिया २१ तारखेपर्यंत चालेल. या काळात अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडतील.
सुजय विखेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार
माजी खासदार सुजय विखे यांचे विरोधी उमेदवार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी विखे यांच्या विरोधात दाखल केलेली हरकत फेटाळली तसेच घोगरे यांच्या अर्जावरील सुचकाने त्यांची सही नाकारली. त्यामुळे घोगरे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. या दोन्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे उमेदवार एकनाथ घोगरे व त्यांचे वकील सुरेश लगड यांनी सांगितले. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज दिवसभर प्रतीक्षा करूनही निकालाच्या प्रति उपलब्ध केल्या नसल्याचे वकील लगड यांनी सांगितले.
२३९ उमेदवार
सेवा सोसायटीच्या अकोले मतदारसंघात १९, जामखेड ३, कर्जत १०, कोपरगाव २, नगर ३, नेवासे १, पारनेर ४, पाथर्डी ३, राहाता २, राहुरी ३, संगमनेर १, शेवगाव २, श्रीगोंदे १०, श्रीरामपूर ४, शेतीपूरकमध्ये २८, बिगरशेती ३७, महिला ४४, अनुसूचित जाती जमाती १२, ओबीसी ४१ व विजाभज- विशेष मागास प्रवर्ग १८ उमेदवार आहेत.
