अहिल्यानगर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे एकत्र बसून तोडगा काढतील. कोणाला लांब ठेवण्याचा या प्रक्रियेपासून कोणाला लांब ठेवण्याचा प्रश्नच नाही. यासंदर्भात राम शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्या पदाचा मानसन्मान ठेवून, त्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी खासदार सुजय विखे यांनी दिले आहे.

माजी खासदार सुजय विखे यांच्या या वक्तव्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार काय, या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. माजी खासदार विखे आज, रविवारी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समवेत एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुजय विखे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का, या शक्यतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी २० तारखेपर्यंत काही बोलणार नाही. मी बोललो तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. त्यामुळे मी निश्चयपूर्वक कमी बोलतो आहे. बिनविरोध करण्यासाठी कमी बोलतो आहे. ज्यांच्या मागे मते नाहीत, अशा लोकांबरोबर चर्चा करण्यात काय अर्थ आहे. याचा अर्थ आम्ही घाबरलो, विपरीत परिणाम होणार म्हणून अशी भूमिका घेत आहोत असा काहींनी गैरसमज करून घेतला आहे. त्यांनी तो गैरसमज दूर करावा. आम्ही निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत. आमचे आयुष्य निवडणूक लढवण्यात गेले आहे.

परंतु दुष्काळी परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन सामंजस्याने भूमिका घ्यावी लागते. माध्यमांसमोर कितीही आवेशात बोलले, पण त्याच्या पाठीमागे किती मते आहेत हे विचारात घेणे आवश्यक आहे. वेळ आणली तर आम्ही निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत, असाही इशारा सुजय विखे यांनी दिला.

तीन अपत्यांमुळे सभापती राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यास कायदेशीर अडचणी निर्माण होणार असल्याची चर्चा आहे, याकडे लक्ष वेधले असता सुजय विखे म्हणाले, वादग्रस्त विषयावर मला बोलायला लावू नका. प्रतिस्पर्धी आमदारांनी मुद्दा उपस्थित केल्याने फुगा फुगला आहे. कोण उमेदवार असेल यापेक्षा समन्वयाने तोडगा निघाला पाहिजे. समन्वयातून शिंदे यांचे मत विचारात घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जाणार नाही. त्यांच्या पदाचा मानसन्मान ठेवूनच निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

बँकेच्या निवडणूक साठी ८०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. प्रत्यक्षात १०९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

राधाकृष्ण विखे-राम शिंदे यांच्यामध्ये चर्चा

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेपासून लांब ठेवल्याबद्दल सभापती राम शिंदे नाराज असल्याकडे लक्ष वेधले असता, माजी खासदार सुजय विखे म्हणाले की, बैठक संगमनेरमध्ये होती. त्याचा निरोप बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. जसा निरोप मला मिळाला तसाच तो राम शिंदे यांनाही दिला गेला होता. पालकमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जामखेडमधील टंचाई आढावा बैठकीवेळी पालकमंत्री व राम शिंदे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे.