अहिल्यानगर: जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आज; गुरुवारी शहरातील सरकारी विश्रामगृहावर चर्चा झाली. ही चर्चा बंद दाराआड झाली. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते. बँकेच्या निवडणुकीसाठी सभापती राम शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकाराची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वेध सध्या लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर सभापती शिंदे यांनी जिल्ह्यातील सहकारातील मातब्बर नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या भेटीगाठी बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभारणीसाठी आहेत की निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आहेत हे त्यांनी स्पष्ट केले नाही. योग्य वेळ आल्यावर आपण ते जाहीर करू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
आज दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याहून बीडला जाताना नगर शहरातील सरकारी विश्रामगृहावर थांबल्या होत्या. त्यापूर्वी सभापती शिंदे विश्रामगृहावर आलेले होते व त्यांची मुरकुटे अभंग यांच्याशी चर्चा सुरू होती. श्रीमती पवार विश्रामगृहावर आल्यानंतर राम शिंदे, भानुदास मुरकुटे व पांडुरंग अभंग यांनी त्यांची भेट घेतली. ही चर्चाही बंद खोलीत झाली. ही चर्चा झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांनीही उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
यापूर्वी सभापती शिंदे यांनी काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक बाजीराव खेमनर, आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे, भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. या भेटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना वगळून होत आहेत.
राम शिंदे यांनी आज माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तसेच सरकारी विश्रामगृहावर बँकेचे माजी संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे व पांडुरंग अभंग यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.
गडाख यांच्या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये- राम शिंदे
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगरमधील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सभापती राम शिंदे म्हणाले, कोणीही या भेटीचा चुकीचा राजकीय अर्थ काढू नये. जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन प्रत्येकाला मिळाले पाहिजे, याच हेतूने गडाख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अनुभवाचे पाठबळ जाणून घेण्याचे नियोजन केले होते.
बँकेसाठी राम शिंदे यांनी पुढाकार घ्यावा- भानुदास मुरकुटे
राम शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भानुदास मुरकुटे म्हणाले, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी बँकेच्या निवडणुकीत पुढाकार घ्यावा, बँकेच्या कामकाजात लक्ष घालावे अशी आम्ही विनंती केली आहे. त्यांनी आमच्या मागणीनुसार योग्य भूमिका घेण्याचे मान्य केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
‘त्यांच्या’ नजरेतून पाहिले तर गैर वाटत असेल
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना वगळून या भेटीगाठी होत आहेत याकडे लक्ष वेधले असता सभापती राम शिंदे म्हणाले त्यांच्या नजरेतून पाहिले तर गैर वाटत असेल, परंतु सहकारात, जिल्हा बँकेत चांगले होण्यासाठी भेटीगाठी आवश्यक आहेत. विखे आणि मी एकाच पक्षाचे आहोत. प्रसंगानुरूप आम्ही दोघे भेटत असतो. बँक निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करणार का, यावर बोलताना राम शिंदे म्हणाले अद्याप प्रारूप मतदार यादी झालेली नाही. नंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल त्यामुळे सध्या बँक निवडणूक बिनविरोध होईल की पॅनल उभे राहतील हे आज तरी सांगणे योग्य नाही.
