अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमच एकत्र आलेले भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार विकास पॅनलच्या सहमती एक्सप्रेसने २१ पैकी १७ जागा जिंकत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. विरोधी सभापती प्रा. राम शिंदे गटाला २ तर सहकार परिवर्तन पॅनलला खासदार निलेश लंके यांच्या रूपाने एकमेव जागा मिळाली. या निवडणुकीतून बँकेमध्ये प्रथमच राम शिंदे गट व खासदार लंके यांचा शिरकाव झाला. लंके यांचा विजय पालकमंत्री विखे यांच्यासाठी धक्का मानला जातो.
मतमोजणीनंतर लगेचच स्वतंत्रपणे निवडून आलेल्या बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे-गायकर (अकोले) यांनी थोरात-विखे गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांचे संख्याबळ १८ झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळात आता एक खासदार, चार आमदारांचा समावेश झाला आहे. विजयी संचालकांमध्ये थोरात गटाचे सर्वाधिक १२, विखे गटाचे ६ संचालक आहेत. बँकेमध्ये शिंदे गट व नीलेश लंके यांचा शिरकाव झाल्याने विरोधकांचा अंकुश राहणार असल्याचे मानले जाते. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव तुषार लोखंडे व स्वतंत्रपणे लढणारे आमदार डॉ. किरण लहामटे यांना पराभव स्वीकारावा लागला. सेवा संस्थांच्या कर्जत, अकोले व पारनेर मतदारसंघासह महिला राखीवच्या दोन, शेती पूरक, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त व ओबीसी या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस रंगली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यातून विखे व थोरात एकत्र आले. ११ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी त्या प्रामुख्याने तालुकानिहाय सेवा संस्था मतदारसंघातील आहेत. तेथे प्रस्थापितांचे वर्चस्व असल्याने, प्रस्थापितांनी ‘कौशल्या’चा वापर करत बिनविरोध केल्या. उर्वरित १० जागांसाठी ३८३७ पैकी ३८०९ मतदान झाले.
आज, मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी करण्यात आली. प्रथम सेवा संस्था मतदारसंघातील त्यानंतर राखीव सहा जागांची मोजणी करण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणी आटोपली.
लोकशाहीची हत्या, निनावी चिठ्ठी
मतमोजणी सुरू असताना मतपेटीमधून एक चिठ्ठी प्राप्त झाली. ‘दुष्काळाच्या गोंडस नावाखाली लोकशाहीची हत्या करून घराणेशाहीसाठी आणि सत्तेसाठी एकत्र आलेल्या गिधाडांना धडा शिकवा…’ असा मजकूर या निनावी चिठ्ठीमध्ये हस्ताक्षराने लिहिलेला होता. मतपत्रिकेला ‘स्टेपल’ केलेली ही चिठ्ठी होती. ती मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली.
मतमोजणीचा निकाल
सेवा संस्था मतदारसंघ: अकोले- संजीवनी शिंदे-गायकर (४९, विजयी), आमदार डॉ. किरण लहामटे (३६). कर्जत – तुषार अंबादास पिसाळ (२०), ज्योती प्रकाश शिंदे (५४, विजयी). पारनेर- खासदार नीलेश लंके (६४, विजयी), राहुल शिंदे (४०). राहुरी- आमदार प्राजक्त तनपुरे (८९, विजयी), सत्यजित कदम (१८), शेतीपूरक मतदारसंघ- आमदार आशुतोष काळे (७५०, विजयी), सुधीर म्हस्के (१२४). महिला मतदारसंघ- अनुराधा नागवडे (२६४१) व संगीता वाघ (२२९२, दोन्ही विजयी) या मतदारसंघात तब्बल ७५ मते बाद झाली आहेत. हर्षदा काकडे १४८९, पुष्पा गायकवाड १४, मंजूषा गुंड ३२, सुवर्णा पाचपुते २८ व संध्या महाडुंळे ४६४ अशी इतरांची मते आहेत. अनुसूचित जाती-जमाती- माजी आमदार वैभव पिचड (२६९०, विजयी), तुषार लोखंडे (१०८६). इतर मागासवर्गीय प्रवर्ग- कारभारी जावळे (२६७६, विजयी), जालिंदर वाकचौरे (७३३), प्रल्हाद गुंजाळ (१०), भानुदास शेटे (२९६), आजिनाथ हजारे (२५). या मतदारसंघात ६६ मते बाद झाली आहेत. भटके विमुक्त- गणपतराव सांगळे (२४६१, विजयी), ऋषिकेश ढाकणे (१२८७) व रावबा गिते (२४). ३७ मते बाद झाली.
बिनविरोध निवडून आलेले
सेवा संस्था: जामखेड – सचिन घुमरे, अहिल्यानगर – आमदार अक्षय कर्डिले, कोपरगाव- बिपीन कोल्हे, नेवासा- माजीमंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी- आमदार मोनिका राजळे, राहाता – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेर – रणजितसिंह देशमुख, शेवगाव- माजी जि. प. अध्यक्ष राजश्री घुले, श्रीरामपूर- नगराध्यक्ष करण ससाणे व श्रीगोंदे- दत्ता पानसरे. बिगर शेती- सचिन जगताप.
