अहिल्यानगर: जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रारुप मतदार यादी केव्हा प्रसिद्ध होते, याकडे लक्ष लागलेले आहे. सध्या बँकेच्या सभासद मतदारांच्या ठरावांची निकषानुसार पडताळणी बँक व सहकार विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यास किमान आठवड्याचा अवधी लागेल, असे सहकार विभागाकडून समजले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारीमध्ये संपली. त्यानंतर आता बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेलेला आहे. सहकार विभागाच्या सहनिबंधक संगीता डोंगरे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्रे आहेत. बँकेच्या सभासद असलेल्या विविध सहकारी सेवा संस्थांना १७ जून ते १६ जुलै दरम्यान मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव पाठवण्याची मुदत होती.
जिल्हा बँकेचे ५८९० सभासद आहेत. त्यापैकी विकास सेवा संस्था १४१४ असल्या तरी ठराव १३६७, बिगर शेती संस्थांची संख्या २३३७ मात्र ठराव १५१८ तर शेतीपूरक संस्था २१३९ तर ठराव केवळ २४३ असे एकूण केवळ ३१२८ ठराव संकलीत झाले आहेत. त्यानंतर आता ही यादी विभागीय सहनिबंधक तथा बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे नाशिकला मान्यतेसाठी पाठविण्यात आली. सभासद शुल्क जमा न केलेल्या, अवसायानात निघालेल्या, बंद पडलेल्या, नोंदणी रद्द झालेल्या, विलीनीकरण झालेल्या संस्थांची नावे वगळण्यासाठी पडताळणी सुरू आहे. त्यामुळे मतदार संख्येमध्ये घट अपेक्षित आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने तांत्रिक आक्षेप घेत तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठरावांची यादी पुन्हा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवली. उपनिबंधक कार्यालयाने या त्रुटी दूर करीत सुधारित यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली. त्यानंतर आता प्रारूप यादी केव्हा प्रसिद्ध होते याकडे लक्ष लागले आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती दावे सूचना मागवल्या जातील, त्यावर सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे निवडणूक दिवाळीनंतर की दिवाळीपूर्वी याची प्रतीक्षा सुरू आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथमच उडी घेऊन सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र त्यांचे हे संपर्क अभियान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आहे की स्वतंत्र पॅनल निर्माण करण्यासाठी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपर्क अभियानात त्यांनी पक्षाचेच नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यापासून अंतर राखले आहे.
