अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये संपत आहे. बँकेच्या प्रशासनाने राज्य सरकारच्या सहकार प्राधिकरणाला बँकेच्या संचालक मंडळाच्या याबाबत माहिती कळवली आहे. मात्र, अद्याप निवडणुकीबाबत प्राधिकरणाकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही.
दि. ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती आहेतच. तसेच सध्या राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुंतलेले असल्याने जानेवारी अखेर तरी बँकेची निवडणूक जाहीर होण्यात साशंकता व्यक्त केली जाते. त्यामुळेच बँकेवर प्रशासक नियुक्त होणार की संचालक मंडळाची निवडणूक लांबणीवर पडणार, याची चर्चा होत आहे.
सेवा संस्थांचे ठराव मागवून मतदार यादी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रियेसाठी, बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. ३१ डिसेंबरनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू केली तरी ती फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार नसल्याने बँकेवर प्रशासक येणार की विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळणार, याबाबत आता उत्सुकता आहे. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एक महिना, ठराव मागविण्यासाठी एक महिना तर मतदार यादी तयार करण्यासाठी एक महिना असे तीन महिने या निवडणुकीसाठी लागतात.
ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने बँकेची निवडणूक लांबण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिल्हा सहकारी बँकेची मागील पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली होती. तर ६ मार्च २०२१ रोजी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड झाली. आता ती मुदत फेब्रुवारी संपत असल्याने त्या दरम्यानच नव्याने संचालक मंडळाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने बँकेच्या प्रशासनाकडून सहकार प्राधिकरणाला संचालक मंडळाच्या मुदतीची व निवडणुकीची माहिती देण्यात आली आहे.
