अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठराविक लोकांचा अड्डा झाली आहे. २८५० कोटी रुपयांचे अनियमित वाटप साखर कारखानदारांना झाले आहे. त्याची वसुली झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. काही कारखानदारांना २००-४०० कोटी रुपये हातउसने दिले गेले. बँकेतील हा धंदा आता बंद करावा लागणार आहे. ‘आरबीआय’च्या नियमाप्रमाणेच कर्जवाटप व त्याची वसुली होईल. ज्यांनी हातउसने पैसे घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असे थेट आव्हान शरद पवार गटाचे खासदार तथा बँकेचे नवनिर्वाचित संचालक नीलेश लंके यांनी दिले.
खासदार लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारनेर सेवा संस्था मतदारसंघातून विजयी झाले. विजयानंतर मतमोजणी ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बँकेच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप व्यक्त केले. खासदार लंके म्हणाले, सहकार क्षेत्रातील आपल्या पदार्पणाचे श्रेय पारनेर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांना जाते. सेनापती बापटांचा हा तालुका दादागिरी सहन करणारा नाही, त्याला भीक घालणारा नाही. प्रस्थापित एका बाजूला जमा झाले असले तरी जनता माझ्याबरोबर होती.
निवडणुकीत मतदारांना अनेक आमिषे दाखवली गेली. सरकारी यंत्रणेचा दबाव वापरला गेला. पण स्वाभिमानी मतदारांनी माझा दणदणीत विजय केला. यापुढे गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण संचालक पदाचा वापर करू, असेही नीलेश लंके म्हणाले. जिल्हा बँक ठराविक लोकांचा अड्डा झाला आहे. साखर कारखानदारांना अनियमित वाटप झाले आहे. ते वसूल केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. कारखानदारांना २००-४०० कोटी रुपये हातउसने दिले गेले. हा धंदा आता बँकेला बंद करावा लागेल. ‘आरबीआय’च्या नियमानुसारच काम करावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला.
‘बाळासाहेब थोरात माझे नेते’
शरद पवार गटाचे खासदार लंके व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत एकत्र आहेत. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थोरात यांनी लंके यांच्या विरोधी पॅनलचे नेतृत्व केले. यासंदर्भात बोलताना लंके म्हणाले थोरात कालही माझे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पदाधिकारी निवडीत आवश्यकता भासल्यास आपण थोरात व राम शिंदे यांच्यासोबत जाऊ.
लांडगे वाघाची शिकार करू शकत नाहीत
आपल्या विरोधात प्रस्थापित एकवटले होते, याचा संदर्भ देऊन खासदार लंके म्हणाले, ‘जंगल मे एकही शेर रहता है’, त्याला कोणीही आडवू शकत नाही. शंभर लांडग्यांनी जरी त्याच्या घेरले तरी ते त्याची शिकार करू शकत नाहीत. एकवेळ ते केवळ वाट आडवू शकतील मात्र शिकार करू शकणार नाहीत, असेही आव्हान लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता दिले.
