अहिल्यानगर : राज्य सरकारकडून निवडणूक प्रचार काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन, विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून होत असलेली कर्जमाफीची मागणी व आंदोलन या पार्श्वभूमीवर शेतकरी बँकांची थकबाकी भरण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याचा परिणाम बँकांच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३० जून अखेरपर्यंत केवळ ५२ टक्के कर्जवसुली झाली आहे. १ लाख ९८ हजार कर्जदारांकडे २५०० कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे.

जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात पीककर्जासह मध्यम व दीर्घ मुदतीचे एकूण ५ हजार ३० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. गेल्यावर्षभरात त्यातील २७०० कोटी रुपये वसूल झाले आहेत. जिल्ह्यात पीक कर्जाचा सर्वाधिक भार जिल्हा बँक उचलते. तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप अत्यंत कमी आहे. बँकेचे एकूण ३ लाखांवर कर्जदार आहेत, त्यातील सुमारे २ लाख कर्जदारांनी वसूल देण्यास प्रतिसाद दिलेला नाही. याचा परिणाम अन्य कर्जदार सभासदांच्या व्याजदरावर होणार आहे.

विधानसभा निवडणूक प्रचार काळात शेतकऱ्यांना विविध पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून मात्र यंदा कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कर्ज परतफेड करण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा कर्जमाफीसाठी आंदोलन झाले. ते मागे घेताना राज्य सरकार, मंत्र्यांकडून आश्वासन दिले गेले. त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली. त्याचा परिणाम पुन्हा कर्ज वसुलीवर झाला आहे. कर्ज परतफेडीचा वेग पुन्हा मंदावला. गेल्या वर्षी निवडणूक काळ होता. त्यावेळीही जिल्हा बँकेची वसुली अवघी ५८ टक्के झाली होती. यंदा त्यामध्ये आणखी घट झाली व केवळ ५२ टक्क्यांवर आली आहे. जिल्हा बँकेकडूनच उपलब्ध झालेली ही आकडेवारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्याजदराचा फटका

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदर आकारले जातो. घेतलेलं कर्ज त्याच वर्षभरात भरले तरच ते शून्य टक्के व्याज आकारले जाते. मात्र मुदतीत भरले नाही तर त्या कर्जाचे रूपांतर नियमित कर्जातून ११ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. कर्जमाफीच्या आशेवर शेतकरी वर्षभरात कर्ज परतफेड करत नसल्याने आता सवलत मिळणार नाही. यापूर्वी दोनदा कर्जमाफी योजना लागू करण्यात आली. तरीही जिल्हा बँकेचे सुमारे १६ हजारांवर सभासद कर्जमाफी योजनेत समाविष्ट होऊ शकलेले नाहीत. या कर्जदारांकडे सुमारे २०० कोटी रुपये थकबाकी आहे. याशिवाय जिल्हा बँक स्वनिधीतून एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवते. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ सुमारे ५०० शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेत ९ कोटी रुपयांची कर्ज परतफेड केली आहे.