अहिल्यानगर: येथील जिल्हाधिकारी कार्यालयास आज, शुक्रवारी दुपारनंतर बॉम्बच्या धमकीचे दोन ई-मेल प्राप्त झाले. त्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली. श्वानपथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजल्यांची तपासणी केली. मात्र कोठे काही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली. विशेष म्हणजे प्राप्त झालेले धमकीचे ई-मेल रशियन व युक्रेन भाषेत होते.
यापूर्वी १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी असाच जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडून देणाऱ्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यावेळीही त्यामध्ये तथ्य नसल्याचे तपासणीनंतर आढळले होते. त्यानंतर आज दुपारी १.५० वा. व पुन्हा त्यानंतर तपासणी सुरू असतानाच ३.५० वा. दुसरा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला.
ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. श्वान व बॉम्बशोधक पथकांनी प्रत्येक मजल्यावरील अधिकाऱ्यांचे दालन, कार्यालय, सभागृहात, तळमजल्यावर जाऊन तपासणी केली. मात्र काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. मागील वर्षी तपासणी करताना सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना इमारती बाहेर काढण्यात आले होते. यंदा मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना इमारती बाहेर न काढता केवळ कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते.
आज प्राप्त झालेल्या दोन धमकीच्या ई-मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत बॉम्बस्फोट घडवले जातील, असा उल्लेख थेट नव्हता. मात्र रशिया व युक्रेनमधील ज्या शहरांमध्ये घडवले जातील, त्या शहरांचा व तेथील ठिकाणांचा उल्लेख होता. धमकी पाठवणाऱ्याने स्वतःचा उल्लेख माजी सैनिक असा करत सहकाऱ्यांच्या मदतीने बॉम्ब कसे लपवले आहेत व दि. ३० व ३१ रोजी दुपारच्या जेवणानंतर त्याचे स्फोट घडवले जातील, याचा उल्लेख केलेला आहे.
क्राकेनचा माजी सैनिक
यापूर्वी १८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ‘आयएसआय’ व ‘मद्रास टायगर’ यांचा उल्लेख करत ‘गयाना रमेश’ या नावाने धमकीचा ई-मेल पाठवला गेला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालययात बॉम्बस्फोट होणार असल्याचे कळवले होते. आज प्राप्त झालेल्या दोन धमकीच्या ई-मेलमध्ये ‘क्राकेन’चा माजी सैनिक, ज्याने मी व माझ्या सहकाऱ्यांनी असा उल्लेख करत पाचशे विबुख उपकरणे युक्रेनमधील शहरे, गर्दीचे ठिकाण, युक्रेनचे इजिप्त व अमेरिकेतील दुतावास, संरक्षण मंत्रालय येथे ठेवल्याचे व दुपारी जेवणानंतर स्फोट घडवले जाणार असल्याचे नमूद केले आहे.
सुरक्षा उपाययोजना
यापूर्वी जेव्हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला, त्याच वेळी सर्व मजल्यावर सीसीटीव्ही बसवण्याची उपाययोजना सुरू केली. आता उर्वरित ठिकाणीही ते बसवले जातील. प्रवेशद्वारावरही सुरक्षा प्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत. – दादासाहेब गीते, निवासी उपजिल्हाधिकारी अहिल्यानगर.

