अहिल्यानगर: वाढत्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ग्राहक आयोगानेही आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज्यात सर्वात प्रथम ही सुविधा अहिल्यानगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये सुरू करण्यात आली. या आभासी पद्धतीच्या सुनावणी सेवेची सुरुवात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील १० जिल्ह्यात, पहिल्या टप्प्यात ही सुविधा निर्माण केली जाणार असल्याची माहिती दिली.

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी प्रत्यक्ष आभासी सुनावणी घेऊन या सेवेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ यंत्रणेतील बारकावे तपासले व सुविधेमध्ये आणखी योग्यता आणण्यासाठी आवश्यक सूचना केल्या तसेच उपस्थित वकिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व प्रश्न समजावून घेतले. यावेळी राज्य ग्राहक आयोगाच्या सदस्य पूनम महर्षी, जिल्हा आयोगाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य चारू डोंगरे, संध्या कसबे, निबंधक कविता कोमार, ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष सुनील मुंदडा तसेच वकील व ग्राहक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुकेश शर्मा म्हणाले, आभासी पद्धतीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर जिल्हा आयोगाने स्वतःहून पुढाकार घेतला. मुंबई खंडपीठाप्रमाणेच याचा ‘सेटअप’ करण्यात आल्याचे त्यांनी कौतुक केले. राज्य आयोगाच्या सदस्य पुनम महर्षी म्हणाल्या, न्यायव्यवस्था खेडेपाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातून न्यायप्रक्रियेत गती मिळणार आहे. चारू डोंगरे म्हणाल्या, ज्येष्ठ वकील व पक्षकारांना सुनावणीसाठी लांब अंतरावरून येणे शक्य होत नाही. यासाठी जिल्हा आयोगाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद यांनी पुढाकार घेऊन आभासी सुनावणी सुरू करण्यात योगदान दिले. त्याचा लाभ ग्रामीण भागाला होणार आहे. वकील संघाचे अध्यक्ष सुनील मुंदडा म्हणाले, कमी खर्चात जलद स्वरूपात ग्राहकांना न्याय देण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी जेष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला. शहर वकील संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब घुले, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख, सचिव अभिजीत देशपांडे, कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे, ज्येष्ठ वकील सुरेश लगड, विद्या तांबोळी, अशोक बंग, शिरीष जोशी, शिरीष गटने, किशोर राऊत, योगेश कुलकर्णी, अरुणा राशिनकर, सुजाता कुमार, शुभ्रा तांबोळी तसेच वकील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शुभांगी बाबर यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धांत गांधी यांनी आभार मानले.