अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम आज, बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सुचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीत बँकेचे ३ हजार ६४७ सभासद मतदार आहेत. त्यात ३६६ संस्थांचे ठराव अपात्र ठरले आहेत तर २३३ संस्थांनी ठराव सादर केलेले नाहीत. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत २० फेब्रुवारीला संपुष्टात आली आहे. मात्र मे महिन्यात बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर जुन महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेतीपुरक मतदारसंघ) व बिगर शेती संस्था मतदारसंघ अशा संस्थाचे मतदार यादी तयार करण्यासाठी १६ जुन ते १६ जुलै कालावधीत ठराव मागविण्यात आले होते.

त्यानुसार निवडणूक अधिकार्‍यांकडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे १ हजार ३६७, बिगर शेती मतदारसंघातून १ हजार ५९५ तर शेती पुरक मतदारसंघातून १ हजार ५१ असे ४ हजार १३ संस्थांचे मतदार ठराव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६६ ठराव अपात्र करण्यात आले आहे. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे ७, बिगर शेती मतदारसंघाचे १२४ तर शेती पुरक मतदारसंघाचे २३५ ठराव विविध कारणांनी अपात्र ठरवले गेले आहेत. २३३ संस्थांनी ठराव दिले नाहीत. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे २७, बिगर शेती मतदारसंघाचे १५६ तर शेती पुरक मतदारसंघाचे ५० संस्थांचा समावेश आहे.

त्यामुळे बँकेच्या निवडणुकीसाठी आता अवघे ३ हजार ६४७ मतदार निश्‍चित झाले आहेत. त्यानुसार उद्या बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यावर हरकती व सुचना करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादी ही जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व तालुकास्तरावर सहनिबंधक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दि. १९ ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत यादीवर हरकती व सुचना मागवण्यात आल्या आहेत. या हरकती व सुचनावर २० सप्टेंबरला निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर लगेच बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय संख्या

अहिल्यानगर-सोसायटी मतदारसंघ- १०९, बिगर शेती २५३, शेतीपूरक मतदारसंघ ३३. संगमनेर- सोसायटी- २३५, बिगर शेती २७९, शेतीपूरक ३१८. कोपरगाव-सोसायटी १०९, बिगर शेती २४०, शेतीपूरक १९४. राहाता-सोसायटी ७१, बिगर शेती ११५, शेतीपूरक १००. श्रीरामपूर-सोसायटी- ६९, बिगर शेती ७१, शेतीपूरक ११. नेवासा-सोसायटी १३१, बिगर शेती ९१, शेतीपूरक ३३. राहुरी- सोसायटी १०७, बिगर शेती ११७, शेतीपूरक ४२. शेवगाव-
सोसायटी ६९, बिगर शेती २३, शेतीपूरक ३२. पाथर्डी- सोसायटी ८४, बिगर शेती ३३, शेतीपूरक १६. जामखेड-सोसायटी ४७, बिगर शेती ५४, शेतीपूरक १८. कर्जत-सोसायटी ७५, बिगर शेती ६८, शेतीपूरक ६५. श्रीगोंदा- सोसायटी २७१, बिगर शेती २०४, शेतीपूरक ५७. पारनेर -सोसायटी १०४, बिगर शेती ८६, शेतीपूरक ४२. अकोले- सोसायटी ८६, बिगर शेती ७१, शेतीपूरक ९२. एकूण ठराव प्राप्त- सोसायटी १ हजार ३६७, बिगर शेती १ हजार ५९५, शेतीपूरक १ हजार ५१.