अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. बॅंकेचे निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी १८ ऑगस्टला बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. या यादीवर २३८ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होवून निकाली काढण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या नियोजनानूसार बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँक प्रशासनाच्या वतीने ५ हजार ८९० हून अधिक मतदारांचे ठराव आणि नावे असणारी यादी सहकार विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवली होती. यातून बंद पडलेल्या, अवसायनात असणार्‍या आणि प्रशासक असणार्‍या संस्था वगळून निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी ३१ ऑगस्टला ३ हजार ६७७ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. या यादी प्रसिध्द करत असतांना ३६६ संस्थेचे ठराव अपात्र ठरवले होते.

जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत २० फेब्रुवारीला संपुष्ठात आली. मात्र, मे महिन्यांत बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर जुन महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेती पुरक मतदारसंघ) व बिगर शेती संस्था मतदारसंघा अशा संस्थाचे १६ जुन ते १७ जुलैपर्यंत ठराव मागविण्यात आले. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांकडे जिल्हा बँकेने ५ हजार ८९० सभासदांची (मतदारांची यादी) पाठवली होती.

यातून ठराव उपलब्ध झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे १ हजार ३६७, बिगर शेती मतदारसंघातून १ हजार ५९५ तर शेती पुरक मतदारसंघातून १ हजार ५१ असे ४ हजार १३ संस्थांचे ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले होते. यातून ३६६ ठराव अपात्र करण्यात आले होते. यात सोसायटी संस्थांचे ७, बिगर शेती मतदारसंघाचे १२४ तर शेती पुरक मतदारसंघाचे २३५ यांचा सामवेश होता तर २३३ संस्थांनी ठराव दिले नव्हते. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे २७, बिगर शेती मतदारसंघाचे १५६ तर शेती पुरक मतदारसंघाचे ५० संस्थांचा समावेश होता.

यामुळे बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सोसायटी मतदारसंघ, बिगरशेती मतदारसंघ आणि शेती पूरक मतदारसंघातून ३ हजार ६४७ आणि ३० व्यक्तीगत असे ३ हजार ६७७ मतदार निश्‍चित झाले होते. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर २४८ हरकती दाखल झाल्या होत्या. यात सर्वाधिक १२३ हरकती एकट्या संगमनेर तालुुक्यातील होत्या तर उर्वरिते नेवासा १४, अकोले १४, पारनेर १०, जामखेड ७, कर्जत १०, श्रीगोंदा १२, नगर तालुका १२, राहुरी ३, श्रीरामपूर ५, राहाता ९, पाथर्डी ६, शेवगाव ४, कोपरगाव ९ यांचा समावेश होता. दाखल हरकतीवर ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान सुनावणी होवून त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत.