अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती आदींविरोधात आज, मंगळवारी हरकती दाखल झाल्या आहेत. याबरोबरच सुजय विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनीही प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात हरकती दाखल केल्या आहेत.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. या उमेदवारी अर्जांची मतदारसंघनिहाय छाननी सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व सहायक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर व रावसाहेब खेडकर यांच्यामार्फत सुरू होती. छाननी व हरकतींवर उद्या, बुधवारी सकाळी ११ वा. निकाल जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मतदारसंघनिहाय अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. छाननीमध्ये उमेदवारी अर्ज योग्य पद्धतीने दाखल केला आहे का, त्यासोबत उमेदवार व त्यांच्या सुचक व अनुमोदकांनी योग्य पद्धतीने कागदपत्रे जोडली आहेत काय, याची पडताळणी निवडणुका अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. त्याचवेळी उमेदवारी अर्जांवर कोणाची हरकत दाखल आहे का, याचीही विचारणा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. त्यासाठी उमेदवार व त्यांचे सुचक वकिलांसह उपस्थित होते. त्यांची मोठी गर्दी निवडणूक कार्यालयात झाली होती.

उमेदवार किंवा सूचक, अनुमोदकांनी योग्य कागदपत्रे उमेदवारी अर्ज सोबत दाखल केली नाहीत, त्रुटी आहेत, त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दुपारपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या कागदपत्रांची छाननी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. सायंकाळनंतर हरकतींची सुनावणी घेण्यात आली. या सर्वांचा निकाल उद्या जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी सांगितले.

सुजय विखे व एकनाथ घोगरे यांचे परस्परविरोधी आक्षेप

सेवा सोसायटीच्या राहतामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी खासदार सुजय विखे व त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी परस्परांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे. विखे यांनी राहुरी कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले, त्याची परतफेड केली नाही, ते थकबाकीदार आहेत, अशी हरकत घोगरे यांनी वकील सुरेश लगड यांच्यामार्फत दाखल केली तर एकनाथ घोगरे यांच्या उमेदवारी अर्जिवरील सूचकाने आपली स्वाक्षरी असल्याचे नाकारले, त्यानंतर त्याचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदवण्यात आला.

रणजीतसिंह देशमुख बिनविरोध होणार का?

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांनी त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवार चित्रा विठ्ठल गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. गायकवाड यांच्या सूचकाने अर्जावरील सही आपली नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सांगितले. यासंदर्भातही उद्या निकाल दिला जाणार आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध हरकत

आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार कडूचंद शेटे यांनी वकील गोरक्ष पालवे यांच्यामार्फत हरकत दाखल केली. आमदार राजळे वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. त्यावरही उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

आमदार किरण लहामटे त्यांच्याविरुद्ध आक्षेप

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारी अर्जावर माजी आमदार वैभव पिचड यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट दाखल केल्याचा आक्षेप घेण्यात आला. हा आक्षेप चुकीचा असल्याचे आमदार लहामटे यांचे म्हणणे होते. त्यावर उद्या निकाल दिला जाणार आहे.

प्रणोती राहुल जगताप यांच्या अर्जावर हरकत

माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ प्रणोती जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांनी हरकत घेतली आहे. जगताप यांचा कारखाना थकबाकीत असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यावर जगताप यांच्या वकिलांकडून खुलासा करण्यात आला. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

दहा वर्षांचे बंधन राहणार की जाणार?

भारतीय रिझर्व बँकेने सलग दहा वर्ष संचालक म्हणून राहता येणार नाही असे बंधन टाकले आहे. या बंधनात जिल्हा बँकेचे माजी संचालक सिताराम गायकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी संचालक अंबादास पिसाळ हे अडकतात की त्यांचे अर्ज वैध ठरतात, याचाही निर्णय उद्या जाहीर केला जाणार आहे. मात्र या तिघांच्याही उमेदवारी अर्जावर या मुद्द्यावरून इतर कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकत दाखल केलेली नाही.