अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सभासद संस्थांच्या प्रतिनिधीचे ठराव उद्या, बुधवारपासून ते १६ जुलैपर्यंत मागवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांची तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदानासाठी ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने ऑगस्टमध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारीमध्ये संपुष्टात आली. त्यानंतर बँकेवर सुरुवातीला एक सदस्यीय प्रशासक व नंतर तीन सदस्य प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून सुमारे ५ ते साडेपाच हजार मतदार संख्या असण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी जिल्हा बँकेने १५ लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणमार्फत निवडणूक घेतली जाते.

संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरता ज्या सहकारी संस्था दिनांक १ जून २०२३ किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील त्याच पात्र राहणार आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असणार नाही. तथापि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल तर अशा संस्थांच्या संचालकाऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्याचा ठराव घेता येईल तसेच ज्या संस्थांच्या बाबतीत 73 कअ (i) एफ (iii) अन्वये कार्यवाही केली असल्यास त्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीत.

बँक सभासद संस्था प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात कार्यालयीन वेळेत १७ जून ते १६ जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करायचे आहेत. सभासद संस्थेने या कालावधीत प्रतिनिधींचे ठराव घेणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेने याबाबतचा सविस्तर तपशील सभासद सहकारी संस्थांना कळवला आहे.

दहा वर्षाच्या बंधनामुळे पत्नी व मुले रिंगणात उतरवणार

यंदाच्या निवडणुकीपासून सलग दहा वर्ष संचालक असलेल्या व्यक्तीस निवडणूक लढवता येणार नाही. त्यासाठी त्याला तीन वर्षाचा खंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी याच नेत्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालक मंडळात अनेक नवीन चेहरे दिसतील.

पॅनलच्या जुळणीकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या नेत्यांमार्फत परस्परविरोधी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असत. दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असले तरी ते परस्परांविरोधात लढत असत. बहुसंख्य वेळा थोरात यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सहकार्यातून बँकेवर वर्चस्व मिळवले. आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचे ठरवले आहे. खासदार निलेश लंके यांच्याही भूमिकाकडे लक्ष राहील. यंदा विखे व थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कशी जुळणी होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहील.