अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १० जागांसाठी आज, सोमवारी झालेल्या एकूण ३८३७ पैकी ३८०९ मतदारांनी (९९.२७ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान उद्या, मंगळवारी सकाळी ९ वा. कल्याण रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात मतमोजणी सुरुवात होणार आहे.

आज मतदान झाल्यानंतर जिल्हाभरातून मतपेट्या पोलीस बंदोबस्तात रात्री नगरमध्ये आणण्यात आल्या. उद्या सकाळी तालुकानिहाय, मतदान केंद्रनिहाय १४ टेबलवर मतमोजणी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात प्रथम सेवा संस्था मतदारसंघातील चार जागांची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याचा निकाल जाहीर केल्यानंतर राखीव सहा जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय असलेल्या एकाच रंगाच्या मतपत्रिका जुळवून त्याचे गठ्ठे तयार केले जातील. त्यानंतर आकडेवारी संकलित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतदार ३८३७ असले तरी त्याची सहा वेळा स्वतंत्र मोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे दुपारी दोन पर्यंत निकाल स्पष्ट होईल. १० जागांपैकी कर्जत, अकोले व पारनेर या जागांच्या निकालाबद्दल अधिक उत्सुकता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार पॅनलचे ११ पैकी १० जागांवर उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदे व नगर तालुक्यातून उमेदवारांना किती मताधिक्य मिळते, त्यावर विजयाची अधिक संधी असणार आहे. जिल्ह्यातील सर्व ३३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी सांगितले.

तालुकानिहाय मतदान

अकोले २३१ पैकी २३१, जामखेड १२५ पैकी ११४, कर्जत १६८ पैकी १६७, कोपरगाव ५२९ पैकी ५२०, नगर ३९१ पैकी ३८७, नेवासा २४६ पैकी २४६, पारनेर २२७ पैकी २२५, पाथर्डी १३१ पैकी १३१, राहाता २६३ पैकी २६०, राहुरी २५८ पैकी २५३, शेवगाव ११७ पैकी ११५, श्रीरामपूर १४७ पैकी १४७ व श्रीगोंदे २९९ पैकी २९९.

सहलीवरील मतदार थेट केंद्रांवर

काही तालुक्यातील मतदारांना संबंधित उमेदवारांनी पूर्वीच सहलीवर देवदर्शनासाठी नेले होते. सहलीवर नेले गेलेले मतदार थेट आज मतदान केंद्रावर खाजगी आरामबसमधून दाखल झाले व त्यांनी एकगठ्ठा मतदान केले. असे असले तरी सहलीवर गेलेल्या मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे, या दृष्टीने उमेदवारांनी व्यूहरचनाही आखली होती. ही व्यूहरचना प्रत्यक्षात किती सफल झाली, याचे चित्र मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

विरोधी संचालक निवडीकडे लक्ष

पारनेर तालुक्यात खासदार नीलेश लंके विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक राहुल शिंदे यांच्या लढतीची मोठी उत्सुकता आहे. अशीच उत्सुकता अकोल्यात आमदार डॉ किरण लहामटे विरुद्ध बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे व कर्जतमध्ये विखे समर्थक तुषार पिसाळ विरुद्ध राम शिंदे गटाच्या ज्योती प्रकाश शिंदे यांच्या लढतीबदलही व्यक्त होत आहे. बँकेवर मतदानापूर्वीच विखे- थोरात गटाचे वर्चस्व निर्माण झाले असते तरी संचालक मंडळात विरोधी कोणत्या उमेदवाराचा समावेश होतो, याकडे लक्ष असणार आहे.