अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारने १ एप्रिलपर्यंत दोन लाखांच्या रकमेची कर्जमुक्ती केली. ही रक्कम ९ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. या कालावधीसाठी बँकांनी व्याज आकारणी करू नये असे राज्य सरकारने बॅंकांना कळवले असले तरी या व्याजाच्या रक्कमेची भरपाई कशी करणार, हा भूर्दंड कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ही रक्कम सुमारे ११४ कोटी रुपये आहे. त्याचा परिणाम जिल्हा बँकेसह प्राथमिक सेवा संस्थांवर होणार आहे. केवळ अहिल्यानगरच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्हा बँकांपुढेही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अद्याप अनेक शेतकरी खातेदार प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बँकेचे अधिक रकमेचे उत्पन्न बुडणार आहे. याशिवाय कर्जमुक्ती योजनेत १ मार्च २०२७ पर्यंत ‘ओटीएस’ लागू करण्यात आली आहे. त्याचा विचार झाल्यास एकूण २१० कोटी ९० लाख रुपयांच्या तफावतीचा प्रश्न निर्माण होणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा बँकेकडून मिळाली.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँकेने ही व्याजाची रक्कम राज्य सरकारने द्यावी, या मागणीसाठी सहकार आयुक्तांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले आहे. दरम्यान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ६२७ कोटी ४७ लाखांची रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे हे खातेदार कर्जमुक्त झाल्याचे दिसत असले तरी पाच महिन्यातील व्याजाच्या रकमेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही.
या व्याजाच्या रकमेची तरतूद कशी करायची असा प्रश्न जिल्हा बँक व प्राथमिक सेवा संस्थांपुढे निर्माण झालेला आहे. त्याची भरपाई न झाल्यास सेवा संस्था आर्थिक अरिष्टात सापडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण १३६६ प्राथमिक सेवा संस्था आहेत.
जिल्हा बँकेच्या १ लाख ९२ हजार २८२ खातेदार शेतकऱ्यांपैकी १ लाख १६ हजार ५१२ पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीसाठी जाहीर झाली. यापैकी १ लाख ५ हजार ५२८ शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅग नोंदणी व आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यानुसार ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अद्याप ३८ हजारावर खातेदार शेतकरी कर्जमुक्तीची रक्कम केव्हा मिळणार याकडे लक्ष ठेवून आहेत. याशिवाय पात्र ठरलेले २९०० खातेदार मृत आहेत, ५४४० खातेदारांकडे ॲग्रीस्टॅग क्रमांक नाही तर आधार प्रमाणीकरण न झालेले १२ हजार शेतकरी आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवले
जिल्हा बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांना एकूण १ हजार ४९५ कोटी ३७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. त्यापैकी ६२७ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पाच महिन्यांच्या व्याजाच्या रकमेसंदर्भात सहकार आयुक्तांकडे बँकेने पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले आहे. –संगीता डोंगरे, प्रशासक, जिल्हा बँक.
सरकारकडे पाठपुरावा सुरू
शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन. बँकेचे प्रशासक व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेगाने, अचूक पद्धतीने प्रक्रिया राबवली. पाच महिन्यांच्या व्याजाच्या रकमेसंदर्भात सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.-चंद्रशेखर घुले, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक तथा माजी आमदार
