अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री सांगतील तीच व्यक्ती बसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे ‘बॉस’ आहेत. ते सांगतील तसेच होईल, बाकी इतर विचार करण्याची आणि कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज, रविवारी नगरमध्ये बोलताना व्यक्त केली.

जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या दोन नेत्यांमध्येच संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सुजय विखे काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा होत आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले.

सुजय विखे म्हणाले, कोणतीही निवडणूक आली की माझे नाव पुढे येते. मागे विधानसभा लागली तरी सुजय विखे, विधान परिषद लागली तरी सुजय विखे यांचे नाव पुढे केले जाते. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची अस्मिता आहे. सहकारातील जे लोक सहकार चालवतात, दूध डेअरी, सहकारी साखर कारखाने चालवतात. त्यांच्यावरच जिल्हा बँकेची जबाबदारी देणे जास्त योग्य ठरेल. तरच बँक अडचणीतून बाहेर निघू शकेल.

जिल्हा बँक हा भाजपअंतर्गत किंवा भाजप- काँग्रेस असा काही विषय नाही. माझ्या नावावर सहमती होत नसेल किंवा माझ्या नावाबद्दल वाद असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. बँकेच्या पदावर बसण्यास मी इच्छुक नाही. उद्देश एकच स्पष्ट आहे. जिल्हा बँक ही एकमेव अशी बँक आहे जी शेतकऱ्यांना कर्ज देते. अन्यथा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभे करत नाहीत. त्यांच्या अटी जाचक असतात. शेतकऱ्यांना न्याय देणारी केवळ जिल्हा बँक आहे. त्यामुळे राहत्याला काय वाटते किंवा काँग्रेसला काय वाटते किंवा कर्जत-जामखेडला काय वाटते, याला काही अर्थ नाही, असा टोलाही सुजय विखे यांनी लगावला.

बँकेच्या अध्यक्षपदी तोच व्यक्ती बसेल ज्याचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील. मुख्यमंत्री फडणवीस आमचे सर्वेसर्वा आहेत, ते आमचे बॉस आहेत, ते सांगतील तेच होईल, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वे शिर्डीकडे वळाली, हा साईबाबांचा चमत्कार

पुणे-नाशिक हा सरळ जलदगती रेल्वे मार्ग रद्द होऊन ती रेल्वे शिर्डीकडे वळवण्यामागे मी कोणताही प्रयत्न केलेला नाही. हा सर्व साईबाबांचा चमत्कार आहे. साईबाबांचे आमच्यावर नेहमीच आशीर्वाद आहेत. साईबाबांनीच ते ठरवलेले दिसते. शिर्डी रेल्वेचा आम्हाला काही उपयोग नाही. साईभक्तांनाच त्याचा जास्त उपयोग होणार आहे. असे असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. पुणे-नाशिक या संगमनेर मार्गे रेल्वेलाच प्राधान्य आहे. त्यातून मार्ग निघत नसेल तर शिर्डीला रेल्वे द्या, अशीच आमची मागणी आहे, असेही सुजय विखे म्हणाले