अहिल्यानगर: शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉंम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करून पोलिसांचे श्वान पथक व बॉंम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला. राज्यातील इतर जिल्हा सत्र न्यायालयांनाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता.

आज, सोमवारी दुपारी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये दुपारी ३ वा. ११ मिनिटांनी न्यायालयाची इमारत बॉंम्बने उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाला ई-मेल प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलीस व बॉम्ब शोधक नाशक पथकाने न्यायालय परिसरात धाव घेतली.

जिल्हा न्यायालयाकडे येणारे सर्व रस्त्यावरील वाहतूक बंद करून परिसर निर्मनुष्य करण्यात आला. न्यायालयाच्या इमारतीत असणारे न्यायिक अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार या सर्वांनाच आवाराबाहेर काढण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अनेकांचा हे दहशतवाद विरोधी हल्ल्याचे प्रात्यक्षिक असावे असा संमज झाला होता. मात्र पोलिसांकडून गांभीर्यपूर्वक उपाययोजना होत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, धावपळही उडाली होती.

बॉंम्ब शोधक व नाशक पथकाने न्यायालयाची इमारत, विविध कक्ष, परिसर आजूबाजूच्या भागाची बारकाईने तपासणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. पोलीस अधीक्षक सुदर्शन स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत होते. नमूद केलेली वेळ उलटून गेल्यानंतर व तपासणीत कोणतीही संसद वस्तू आढळली नसल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे खात्री केल्यानंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. धमकीचा ई-मेल कुठून प्राप्त झाला, याचा तपास केला जात आहे.

यापूर्वीही नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल काही महिन्यांपूर्वी प्राप्त झाला होता. हा ई-मेल युक्रेनमधून पाठवला गेला होता, मात्र त्याचा पुढे तपास झाला नाही. त्यावेळीही अशीच पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली होती. राज्यातील इतरही काही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत उडवून देणारा धमकीचा ई-मेल पाठवला गेला होता.