अहिल्यानगर: राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. नंतर उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीस स्थगिती दिली. परंतु आज, मंगळवारी ग्रामविकास विभागाने मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची तात्काळ प्रभाग रचना करण्याचा आदेश दिले आहेत. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला सुरुवात केली जाईल.

नगरपालिका, महानगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने जानेवारी-डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर टप्प्याटप्प्याने प्रशासक नियुक्त होणार आहेत. यामुळे किमान सहा महिने ते वर्षभर निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रशासक नियुक्तीला सरपंच परिषदेसह नागरिकांमधून विरोध होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख निश्‍चित नसली तरी ग्रामविकास विभागाने मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपते, त्यापूर्वी सहा महिने संबंधित संस्थेच्या हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही. त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीची तात्काळ प्रभाग रचना करण्याची सूचना देण्यात आली आहे. यानुसार तहसीलदारांनी गावाचा नकाशे करावा, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग, सीमा निश्‍चित करावी तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

ग्रामविकास विभागाने निश्‍चित केलेल्या कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारी ते २३ एप्रिल दरम्यान नकाशे तयार करणे, प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव करणे, जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे, आवश्यक दुरुस्त्या करणे, निवडणूक आयोगाला प्रारुप आराखडा सादर करणे, आयोगाच्या सूचनांची दुरुस्ती करणे, प्रारुप रचनेची प्रसिद्धी करुन हरकरती, सूचना मागवणे, उपविभागीय अधिकारी यांच्यापुढे सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांना अभिप्राय सादर करणे आदी प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील प्रभाग रचना होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे:अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, अहिल्यानगर ५९, पाथर्डी ७८, शेवगाव ४८, कर्जत ५६, जामखेड ४७, पारनेर ८८ व श्रीगोंदा ५९.

प्रभाग रचनेचा कार्यक्रम

  • ७ एप्रिल – प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध
  • १३ एप्रिल – हरकती घेण्याची अंतिम तारीख
  • २१ एप्रिल – हरकती व सूचनांवर सुनावणी
  • २८ एप्रिल – अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर
  • ४ मे – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध.