अहिल्यानगर: जिल्ह्यात गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या कालावधीत डॉल्बी साउंड सिस्टिम व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरास आज, सोमवारपासून प्रतिबंध घालण्यात आल्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी काढले आहेत. दि. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या गणेशोत्सवात तसेच ११ ते २० ऑक्टोबर या नवरात्रोत्सव कालावधीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरामुळे ध्वनी प्रदूषण निर्माण होऊन वृद्ध व्यक्ती, रुग्ण, गर्भवती महिला, लहान मुले व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे असे नमूद करत ही बंदी घालण्यात आली आहे. आदेशात म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकांच्या न्यायनिवड्यामध्ये ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करताना पोलीस प्रशासन व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होते. प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

गणेश प्रतिष्ठापना, गणेश विसर्जन, घटस्थापना व दसरा या काळात डॉल्बी साउंड सिस्टिम व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सार्वजनिक शांततेचा भंग होतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मानवी आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या कालावधीत डीजे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील डॉल्बी मालक, चालक यांनी ते उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीमला प्रतिबंध करण्याकरता मालक व चालकांनी ती वापरत आणू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत डॉल्बी चालक व मालक यांना अशा उपकरणांचा वापर, भाड्याने पुरवठा किंवा उपलब्ध करून देता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नगर शहर पोलिसांनी ४९२ जणांना तडीपार करण्याची कारवाई केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली. याशिवाय उत्सव काळात शांतता ठेवावी यासाठी ३८३ जणांकडून बंधपत्र घेण्यात आले आहेत.