अहिल्यानगर: नगर शहरापासून सुमारे १३-१४ किमी. अंतरावर निमगाव वाघा गाव आहे. या गावात श्रीपती सहादू देवकर यांची तीन एकर जिरायती शेती आहे. २६ हजार रुपये खर्च करून त्यांनी बाजरीची पेरणी केली. काही भागात खरिपातील कांदाही लावला होता. मात्र पिके पाण्याअभावी करपून गेली. गावातील विहिरीचे पाणीही खोल गेले आहे. देवी तलावही कोरडाठाक पडला आहे. खरीपात नुकसान झाले, आता रब्बीची पेरणी कशी होणार असा प्रश्न त्यांना पडला आहे. यंदाची दिवाळी कशी साजरी करू, अशी आर्त हाक त्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या सदस्यांसमोर दिली.
केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुस्वामी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रमुख अब्सार अहमद खान व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांच्या पथकाने आज, शुक्रवारी अहिल्यानगर तालुक्यातील चास व निमगाव वाघा या दोन गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेतली. समवेत कृषी आयुक्त सूरज मांढरे,
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी सुधिर पाटील, तहसीलदार मुकुंद कुलथे आदी उपस्थित होते.
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर तीन अधिकाऱ्यांचे पथक प्रथम चास व नंतर निमगाव वाघा गावात गेले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पथक कर्जतकडे रवाना झाले. चास गावातील पोपट गवळी व अनिल गवळी यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. पोपट गवळी यांनी ४० गुंठ्यांमध्ये १६ हजार रुपये खर्च करून सोयाबीन लागवड केली. मात्र पीक पाण्याअभावी करपून गेले. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने चांगले पीक आले होते. सरपंच युवराज कार्ले यांनी विहिरीला पाणी राहिले नाही, पिण्याचे पाणी मुळा धरणातील योजनेद्वारे गावात येते, मात्र हिरवा चारवा चारा राहिला नाही. चाऱ्याचे भाव वाढले आहे अशी माहिती दिली.
चास नंतर पथक दीड ते दोन किमी. अंतरावरील निमगाव वाघा गावातील जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे तलाव असलेल्या, देवी तलाव येथे गेले. तलाव कोरडाठाक पडला होता. श्रीपती सहादु देवकर व भिकाजी सहादू देवकर यांच्या कांदा, तूर, बाजरी, लागवड केलेल्या शेताची पाहणी केली. तेथील पीकही करपून गेलेले होते. गावातील दुग्ध उत्पादनही कमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी पथकाला दिली.
पथकाने महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या प्रतीचीही पाहणी केली. मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक दुष्काळामुळे हातातून गेले, त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. रामदास फुले यांनी गावात चारा डेपो व जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची मागणी केली.
सरकारला अहवाल सादर करणार
केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार आम्ही दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. सरकारचे नियम व निकषानुसार नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल सरकारला सादर करणार असल्याचे पथकाचे प्रमुख डॉ के. पोन्नुस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
