अहिल्यानगर:महापालिकेच्या ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियाना’त आत्तापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी ९ हजार घरांना भेटी दिल्या. २८ हजार पाणीसाठ्यांची तपासणी केली. त्यापैकी २७० पाण्यासाठे दूषित आढळले, तेथे डेंग्यूच्या आळ्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. आत्तापर्यंत शहरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले आहेत.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. महापालिका दर शनिवारी एका प्रभागात डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान राबवते. तेथे जनजागृती करून नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधासाठी जनजागृती केली जाते. या अभियानाच्या दहाव्या आठवड्यानिमित्त आज, शनिवारी बोल्हेगाव भागातील गांधीनगर परिसरात जनजागृती व पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यूमुक्त अभियानअंतर्गत पथनाट्य, निबंध, वकृत्व व सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण केले.
डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानात पाणीसाठ्यांच्या तपासणीत डेंग्यूच्या आळ्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने संबंधित पाणीसाठ्यांवर उपाययोजना करण्यात येतात. धूर व औषध फवारणी करून पाण्यात अबेट औषध टाकण्यात येते. परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचारही करण्यात येतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे डेंग्यू रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. आत्तापर्यंत शहरात केवळ सहा डेंग्यूरुग्ण आढळले. जनजागृती मुळे डेंग्यूमुक्त अभियानाची लोकचळवळ उभी राहत आहे. त्यामुळे डेंग्यूरुग्णांची संख्या कमी झाल्याचे डांगे यांनी सांगितले.नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले, नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची खबरदारी घ्यावी आठवड्यातून एकदा घर व परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करून ते स्वच्छ ठेवावेत. एक दिवस कोरडा पाळावा.
मनपा अधिकारी व आरोग्य पथकाने नागरिकांच्या घरोघर जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली. सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणच्या पाणीसाठ्यांचीही तपासणी करण्यात आली. डेंग्यूसदृश्य आळ्या आढळून आल्या ते पाणीसाठे नष्ट करण्यात आले. परिसरात धूर फवारणी करण्यात आली. नगरसेविका आशा कातोरे, सामाजिक कार्यकर्ते किसन भिंगारदिवे, उद्योजक केशव नागरगोजे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर, नियंत्रण अधिकारी डॉ. सृष्टी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा चेलवा, डॉ. प्रवीण डुंगुरवाल, मुख्याध्यापक ए. एल. सातपुते आदी उपस्थित होते.
