अहिल्यानगर:जिल्ह्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून शासनाकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही. सरकार शेतकर्‍यांचा अंत पाहत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज बुधवारी नगरमधील ‘इंडिया आघाडी’च्या मोर्चा प्रसंगी बोलताना केला.

दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत द्यावी, तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, या मागण्यांसाठी आमदार दानवे व शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया आघाडी’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाड्या व ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढला. सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चानंतर दानवे यानी पत्रकारांशी संवाद साधला.हात

अंबादास दानवे म्हणाले, जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर होत आहे. अशा वेळी सर्वप्रथम जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. केवळ पंचनामे करून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचली पाहिजे. सरकार संवेदनशील राहिलेले नाही. सरकारला निवडणुकांमध्ये रस असून, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ नयेत, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. जुन्या ‘आरटी’ओ कार्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला.

आमदार सुनील शिंदे, प्रताप शेळके, सिताराम काकडे, संदीप वर्पे, गोरख दळवी, किरण काळे, सुभाष लांडे, किरण पाटील, दीप चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांची अनुपस्थिती

काँग्रेसची माजीमंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्यात उपस्थित असूनही मोर्चाकडे फिरकले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ठाकरे गटाचे आमदार दानवे म्हणाले जिल्हा बँकेच्या नाराजीचे इंडिया आघाडीमध्ये कारण असू शकत नाही निलेश लंके एकटे नाहीत आम्ही त्यांच्याबरोबर आहेत काँग्रेसचे पदाधिकारी ही मोर्चामध्ये सहभागी आहेत.

नीलेश लंके यांचे सुजय विखे यांना प्रत्युत्तर

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करावी, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना लंके यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. हे जाड कातडीचे सरकार आहे. आम्ही प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जातो आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतो. मात्र शेतकर्‍यांचे दुःख सरकारपर्यंत पोहोचवायचे असेल, तर आंदोलन करावेच लागते, असे लंके म्हणाले.