अहिल्यानगर: जिल्ह्यात पुढील पावसाळ्यापर्यंत, जून २०२७ पर्यंत तब्बल १ हजार १०९ गावे व ५ हजार २४१ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. या संभाव्य टंचाईग्रस्त गावे- वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ९९९ उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहेत. त्यात ८४२ गावे व ४ हजार ५७६ वाड्यांना २ हजार ३७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा समावेश जिल्ह्याच्या टंचाई निवारण आराखड्यात केला आहे.

एल निनो प्रभावामुळे यंदा ऑगस्टपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली, राज्य शासनाने ऑक्टोबरमध्येच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा ४७२ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यात केवळ टँकरने पाणीपुरवठा या उपाययोजनेसाठी ३८२ कोटी ४६ लाखांची संभाव्य तरतूद केली आहे. एकट्या जामखेड तालुक्याला ७६ कोटींची तरतूद केली आहे. आराखड्यात माणसाबरोबरीने जनावरांना पाणीपुरवठ्याचाही समावेश आहे.

यंदा पाणीटंचाई बिकट असणार आहे. आराखड्यातील उपाययोजनांसाठी ४७१ कोटी ६९ लाख १८ हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. बुडक्या खोदईची २८ कामां १४ लाख रु., विहिरी खोल करणे व गाळ काढण्याची २७७ कामांसाठी ७.८० कोटी, ४३८ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ३.१३ कोटी, टँकर भरण्यासाठी १३४ विहिरी अधिग्रहणासाठी २.१० कोटी, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी २३८७ टँकरची आवश्यकता असून त्यासाठी ३८२ कोटी ४६ लाखांच्या निधीची आवश्यकता भासेल.

प्रगतीपथावरील ५६ नळयोजना पूर्ण करण्यासाठी ६.५८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. १७७ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५५.५९ कोटी, ३४० ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी ३.४० कोटी, ५४ तात्पुरत्या पुरक नळ योजना घेण्यासाठी ५.५ कोटी तर १०७ स्त्रोत बळकटीकरणासाठी ५.३९ कोटी खर्च अपेक्षित आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जामखेड तालुक्यात तब्बल २६३ टँकरसाठी ७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पारेनरसाठी ४०० टँकर लागणार असून ६५.६१ कोटी, श्रीगोंदा २३५ टँकरची गरज लागणार असून ४६.६८ कोटी, पाथर्डीमध्ये २७८ टँकरसाठी ४४.४६ कोटी तर सर्वात कमी श्रीरामपूरमध्ये २५ टँकरची आवश्यकता भासू शकते, त्यासाठी १.६५ कोटी खर्च अपेक्षित आहे. हा खर्च जून २०२७ पर्यंत लागेल असे गृहीत धरले आहे.