अहिल्यानगर:’एक देश – एक विद्यार्थी ओळखपत्र (अपार- आयडी) तयार करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र, अद्याप अहिल्यानगर जिल्ह्यात ५२ हजार ९७६ विद्यार्थ्याचे ‘अपार ओळखपत्र’ काढण्यात आलेले नाही.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या संदर्भातील आढावा घेतला. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमधून पहिली ते बारावीपर्यंतचे ८ लाख ३८ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ८५ हजार ४०४ ‘अपार ओळखपत्र’ काढण्यात आलेले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर सरकार पातळीवरून कोणत्याच सुचना न आल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ‘अपार’ नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे.

दरम्यान यापूर्वी नोंदणी झालेल्या अपार नोंदणीचे प्रमाणिकरण सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते बारावी, अशा एकूण ५ हजार २६२ शाळांतून ८ लाख ३८हजार ८५८ विद्यार्थी आहेत. त्यातील ७ लाख ८५ हजार ४०४ विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार झाले असून ७ लाख ८५ हजार ७४२ जण (९३.६८ टक्के) अपार ओळखपत्र काढलेले आहेत तर ५२ हजार ९७६ विद्यार्थ्यांचे अपार अद्यापही काढलेले नाही.

प्रवेश परिक्षांसाठी आवश्यक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे ‘अपार आयडी’. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आधार कार्ड व शालेय नोंदीदरम्यान नावात तफावत, पालकांची माहिती अपूर्ण असणे, तसेच तांत्रिक अडथळे या प्रमुख अडचणी येत आहेत. शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून ‘अपार आयडी’ तयार करता येतो. त्यासाठी पालकांचे संमतीपत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. शासनाने ‘अपार आयडी’साठी सक्ती केलेली नाही. मात्र सीईटी, नीट, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी ‘अपार आयडी’ आवश्यक आहे.

तालुकानिहाय शिल्लक संख्या

कर्जत १५३१, अकोले २४५७, जामखेड २५९१, श्रीरामपूर २६४८, पारनेर २७३१, श्रीगोंदा २८६७, नगर ३१८५, राहुरी ३३९१, राहाता ३५९५, शेवगाव ३७०१, कोपगरगाव ४०३८, पाथर्डी ४०८८, मनपा ४२२६, नेवासा ५५९४, संगमनेर ६४०३.