अहिल्यानगर : जिल्ह्यातील सर्वेक्षणात ग्रामीण भागात १ लाख ५ हजार तर शहरी भागात २२ हजार अशा एकूण १ लाख २७ हजार एकल महिला आढळल्या, एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात १ हजार एकल महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात आले. त्या आता दरमहा किमान १० हजार ते कमाल १ लाख रुपये दरमहा उत्पू मिळवू लागल्या आहेत.
हा अहवाल जिल्हा कौशल्य विकास समितीच्या वतीने एकल महिला सक्षमीकरण समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनांनी सादर केला आहे. देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, पंचगंगा शुगरचे प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना विनायक देशमुख यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री विखे यांच्या पुढाकारातून एकल महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यासाठी बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आदी १ लाख २७ हजार एकल महिला आढळल्या.
पालकमंत्री विखे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महिला एकल महिला सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये विविध विभाग प्रमुखांचा समावेश करण्यात आला. या समितीमार्फत एकल महिला सक्षमीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला.
‘उमेद अभियाना’च्या माध्यमातून १८ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. आवश्यकतेनुसार कर्ज, अनुदान उपलब्ध करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १ हजार एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले. आगामी वर्षभरात आणखी १ हजार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे अनुकरण करत आता राज्यातील सर्व जिल्ह्यात एकल महिला सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र विशिष्ट इष्टांक निश्चित करून विशिष्ट कालावधीत प्रशिक्षण व अर्थसाहायाच्या माध्यमातून एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अहिल्यानगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरल्याचा दावाही समितीचे सदस्य देशमुख यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे करण्यासाठी कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध नसताना शासनाच्या सध्या सुरू असलेल्या विविध योजनांचा उपयोग करून एकल महिलांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला
आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या एकल महिलांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे: अकोले २९, जामखेड २०, कर्जत ४२, कोपरगाव ५४, अहिल्यानगर ७२, नेवासा ११२, पारनेर १०५, पाथर्डी २८, राहाता ७४, राहुरी ५३, संगमनेर २०४, शेवगाव ४२, श्रीगोंदे ६३ व श्रीरामपूर ५०.
