अहिल्यानगर: विधानमंडळ अंदाज समितीचा जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणी व तपासणीसाठी आज, गुरुवारपासून जिल्हा दौऱ्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी समितीच्या २७ सदस्यांपैकी केवळ ७ सदस्य सहभागी झाले होते. समितीच्या बैठकीत वाळू उपशामुळे खराब होणारे रस्ते तसेच नगर शहरात ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे करून झालेली बांधकामे याबद्दल झाडाझडती घडली.

आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती आज, उद्या, शुक्रवार व परवा, शनिवारी असे तीन दिवस जिल्ह्यात आहे. समितीच्या २७ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे कळवले होते. प्रत्यक्षात ७ सदस्य उपस्थित राहिले. उर्वरित सदस्य उद्या व परवा सहभागी होतील असे खोतकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी समितीचे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन स्वागत केले.

समितीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बंद सभागृहात आढावा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. सकाळच्या सत्रात आरटीओ, महापालिका व कृषी विभागाकडून माहिती घेण्यात आली. बैठकीची माहिती बाहेर कोणी देऊ नये अशी सक्त सूचना करण्यात आली होती. समितीला महापालिकेकडून चुकीची आकडेवारी सादर झाल्याने गोंधळ उघड झाला. सुधारित आकडेवारी सादर करण्यास सांगण्यात आले.

शहरातील ओढे-नाल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे, सारडा महाविद्यालयजवळ नाल्यांवर झालेले बांधकाम, दीर्घकाळ प्रलंबित असलेली फेज-२ योजना, अमृत पाणी योजना यासह यूआयडीएसएससी योजनेतील कामांची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडून समितीने मागवली. समितीच्या आढावा बैठकीत वाळू वाहतूकीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.

वाळूतून प्रत्यक्षात मिळणारा महसूल व त्या तुलनेत अधिक रकमेचे खराब होणारे, यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचे असा प्रश्न समितीने उपस्थित केला. मोठ्या मालमोटारीऐवजी छोट्या वाहनातून वाळू वाहतूक करण्याची सूचना करण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या वाहतुकीबद्दलही आरटीओला विचारणा करण्यात आली.

दूध उत्पादनाबद्दल जिल्ह्याचे कौतुक

राज्यात सर्वाधिक ४८ लाख दूध उत्पादन व संकलन नगर जिल्ह्यात होत असल्याबद्दल समितीने कौतुक केले. याचा आदर्श इतर जिल्ह्यांनी घेतला पाहिजे, असेही समितीकडून सांगण्यात आले. समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष खोतकर यांची शहरातील शिवसेना पदाधिकारी संभाजी कदम, संदेश कार्ले, विक्रम राठोड, रामदास भोर, बाळासाहेब बोराटे आदींनी भेट घेतली.

आज कामांची प्रत्यक्ष तपासणी

समितीचा दौरा तीन दिवसांचा आहे. आज अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेण्यात आली. उद्या आणखीन काही आमदार सहभागी झाल्यास त्यांचे गट करून जिल्ह्यातील कामांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. परवा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्रुटींबद्दल चर्चा केली जाणार आहे.