अहिल्यानगर: जिल्ह्यात उद्योजकतेची सक्षम फळी असून उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याने निर्यात वाढीस मोठा वाव आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी साखर व दुग्धजन्य उत्पादने निश्चित करण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यातून १ हजार ४७९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली जातात मात्र निर्यातीसाठी केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने यांनी केले.
उद्योग विभागाच्या वतीने शहरात ‘निर्यात प्रोत्साहन परिषद-२०२६’चे (महानिर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन-२०२६) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, एमआयडीसीचे प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी, उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खताळ, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उद्योजक हरजितसिंग वधवा, अरुण ठोंबरे, उद्योग अधिकारी अशोक बेनके, श्याम बिराजदार आदी उपस्थित होते.
जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन यावर विशेष भर देणे गरजेचे आहे, मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांना आवश्यक परवानगी अत्यंत कमी कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत असून शासनामार्फत निर्यात वाढीसाठी विविध सवलती, सुविधा व प्रशिक्षण कार्यक्रमही राबवण्यात येत आहेत, उद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन निर्यात वृद्धीसाठी अधिक प्रयत्न करावेत असे आवाहन श्रीमती सोने यांनी केले.
उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते म्हणाले, उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आयोजित महानिर्यात इग्नाइट कन्व्हेन्शनच्या माध्यमातून उद्योजकता व निर्यात वाढीस निश्चित चालना मिळेल. केंद्र राज्य शासनाच्या उद्योगविषयक, स्टार्टअप तसेच निर्यात प्रोत्साहन योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास रोजगारनिर्मिती बरोबरच निर्यात वाढीस चालना मिळेल. प्रशासन उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानगी, सुलभिकरण, मार्गदर्शन व विविध यंत्रणातील समन्वयासाठी सहकार्य करत आहे.
प्रादेशिक संचालक विवेक पक्षी म्हणाले, सेवा क्षेत्रातील निर्यात ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी मोठी संधी ठरू शकते. माहिती तंत्रज्ञान, आयटीआयटीएस, हेल्थकेअर, शिक्षण, पर्यटन, लॉजिस्टिक्स, डिझाईन, कन्सल्टन्सी आदी सेवा क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांकडे आवश्यक कौशल्य व क्षमता उपलब्ध आहे. निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या माध्यमातून या सेवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जोडता येते. एसइपीसीमार्फत सेवा निर्यातदारांना नोंदणी मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती, व्यापार शिष्टमंडळे, शासकीय निर्यात प्रोत्साहन योजनांचा लाभ मिळतो. डिजिटल माध्यमांमुळे जागतिक स्तरावर सेवा देणे सुलभ झाले असून उद्योजकांना गुणवत्ता, वेळेचे पालन, आंतरराष्ट्रीय मानके, डेटा सुरक्षेवर भर देत एसइपीसी संलग्न होऊन सेवा निर्यात वाढीसाठी सहभाग घ्यावा.
महाव्यवस्थापक शिवदास यांनी परिषदेची माहिती दिली. दुपारच्या सत्रामध्ये मैत्री व ईज ऑफ डूइंग बिजनेस या विषयावर मैत्री पोर्टलच्या प्रियदर्शनी सोनार व सल्लागार योगा देवधर यांनी सादरीकरण केले. निर्यात प्रोत्साहन विषयावर विदेश व्यापार महासंचालनालयाचे अरुण खामेरे यांनी माहिती दिली आयआयडीबीएच्या व्यवस्थापक प्रियांका मेहता यांनी अनुदान योजनेची माहिती दिली. इंडिया पोस्टचे दीपक नागपुरे यांनी विमा योजनेची माहिती दिली. सहाय्यक व्यवस्थापक महेंद्र भाले यांनी एसआयडीबीआयच्या योजनांची माहिती दिली. निर्यात सल्लागार सुरज जाधव यांनी शासनाच्या निर्यात धोरणाची माहिती दिली. संगमनेर येथील रणजीत वर्पे यांनी निर्यात अनुभव कथन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम बिराजदार यांनी आभार मानले.
