अहिल्यानगर: नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून, त्यांचा विश्वास संपादन करून, बनावट नोटांचा वापर करून, पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ९२ लाख ९ हजार रुपये रुपये दराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या कारवाईची माहिती दिली. गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, अशोकनगर, बारामती, पुणे), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, या. तांदुळवाडी, गुलमोहर सोसायटी, बारामती) व सुरज वसंत कांबळे (वय २७, रा. झारगडवाडी, बारामती, पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आणखी तीन जण फरार आहेत. अटक केलेल्या तिघांकडून भारतीय चलनाच्या ५०० रुपये दराच्या १८४१९ बनावट नोटा, पाच मोबाईल, एक वॉक्सवॅगन कंपनीची मोटर (एमएच १४ डीएफ ०३६५) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील आणखी तीन जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे तिघेही फरार आहेत.
नगर एमआयडीसीमधील वडगाव गुप्ता रस्त्यावर विनायक कॉलनीमध्ये गणेश शेवाळे व त्याच्या साथीदारांकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असून ते स्वतःच्या फायद्यासाठी, व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलिस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहिद शेख, संदीप पवार, विष्णू भागवत, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले.
पथकाने गणेश शेवाळे याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी जिन्या खालील पिशवीमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा व बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदांचे बंडल आढळले. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता गणेश शेवाळे याने बोल्हेगावमधील त्याच्या दोघा साथीदारांसह मालेगाव (नाशिक) येथील एकाकडून २५ हजार रुपये देऊन बनावट नोटा खरेदी केल्याचे आढळले.
या आरोपींनी यापूर्वी नागरिकांना पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून, नागरिकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून, पैसे घेऊन फसवणूक करण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांची अशा स्वरूपाची फसवणूक झाल्याची तक्रार असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी केले आहे.
