अहिल्यानगर : शरीरास अपाय होईल अशा रसायनांचा वापर करून बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली तसेच १३ लाख ९२ हजार १९० रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील गजराजनगर भागातील कालीमाता मंदिराजवळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार असिफ खुदाबक्ष तांबोळी (वय ५०, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), जफर चांद शेख (वय ३८, रा. मुकुंदनगर), दाऊद बाबुमिया शेख (वय ४२, रा. सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनीही सहभाग घेतला.

शहरातील गजराजनगर भागात राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक अशी सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती कळवून घटनास्थळी बोलवले.

छापा टाकलेल्या कारखान्यात साधी तंबाखू आणून त्यात रसायन, रंग यांचे मिश्रण तयार करून त्यापासून बनावट सुगंधीत तंबाखू व पानांमध्ये टाकण्याचा बनावट किमाम तयार केले जात असल्याचे आढळले. ही बनावट सुगंधीत तंबाखू व बनावट किमाम मावा तयार करण्यासाठी वापरले जात होते.

या कारवाईमध्ये सुगंधित तंबाखू तयार करण्याचे ३ मिक्सर, ६०० किलो सुगंधित तंबाखू, सुगंधित तंबाखूच्या पिशव्या सील करण्याचे तीन मशीन, १५ किलो रंग, चुना, पॅराफिन रसायन, ९० हजार रु. किमतीचे पानांमध्ये टाकण्याचे बनावट किमाम तसेच इतर साहित्य व टाटा सफारी मोटर (एमएच १७ व्ही ७००) असा एकूण १३ लाख ९२ हजार १९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, बिरप्पा करमल, संतोष खैरे, शिवाजी कावडे, अरविंद भिंगारदिवे, उमाकांत गावडे व सोनल भागवत यांच्या पथकाने सहभाग घेतला.