अहिल्यानगर: कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ची (शेतकरी ओळखपत्र) सक्ती करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या लाभासाठीही ‘फार्मर आयडी’ बंधनकारक केल्याने १ लाख ३० हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीमध्ये अडचणी जाणवणार आहेत. या शेतकर्‍यांना तातडीने ई-केवायसी करून ‘फार्मर आयडी’ काढावे लागणार आहेत. अन्यथा ते कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ धारक शेतकऱ्यांची संख्या ८७.४ टक्के आहे तरीही अद्याप १ लाख ३० हजार शेतकर्‍यांनी हे ओळखपत्र काढलेले नाही. पोर्टलवरील अडचणी आणि प्रशासकीय मंजुरीतील विलंबामुळे या कामाची गती मंदावल्याने १३ टक्के शेतकर्‍यांकडे अजूनही फार्मर आयडी नसल्याची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली.

जिल्ह्यात १० लाख २४ हजार ६२८ शेतकरी आहेत, त्यापैकी ८ लाख ९५ हजार ५२६ शेतकर्‍यांकडे ओळखपत्र आहे. मात्र, १ लाख २९ हजार ८०० शेतकर्‍यांना उपलब्ध झाले नाही. कोपरगाव, अहिल्यानगर आणि नेवासा तालुक्यांत केवळ ७७ ते ८० टक्के शेतकऱ्यांकडे ओळखपत्र आहे. काही तालुक्यांमध्ये ८४ ते ९८ टक्क्यांपर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे. अकोले तालुक्यात ५३ हजार १६० लक्ष असताना प्रत्यक्षात ५४ हजार ५४२ शेतकर्‍यांची नोंदणी होऊन १०२ टक्के काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी हे फार्मर आयडी अनिवार्य असल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच कर्जमाफीसाठीही फार्मर आयडी बंधनकारक केले आहे.

गेल्या वर्षभरात अतिवृष्टीच्या नुकसानीची रक्कम केवळ ओळखपत्र असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी ओळखपत्र नोंदणीसाठी गर्दी केल्याने मध्यंतरी महाआयटीचे पोर्टल संथ झाले होते. ही तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर आता कामाला पुन्हा गती आली आहे. गेल्या महिनाभरात नवीन ओळखपत्र काढणार्‍यांची संख्या वाढली, जिल्ह्यात दररोज २५० ते ३०० ओळखपत्र तयार केले जात आहेत.

कृषी योजनांसाठी बंधनकारक

केंद्र व राज्य शासनाचे पीक कर्ज, सबसिडी, बियाणे, खते, कृषी अवजारे अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हा शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केले आहे, ज्यामुळे लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेसाठी पात्र असणार्‍या ५ लाख ३९ हजार ८०७ शेतकर्‍यांपैकी ४ लाख ८८ हजार १९० शेतकर्‍यांनी ओळखपत्र काढले आहे.

अहिल्यानगर, कोपरगाव, शेवगाव, राहुरी पिछाडीवर

शेतकरी ओळखपत्र काढलेल्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे :अकोले १०२.६० टक्के, पाथर्डी ९७.६२, श्रीगोंदा ९७.४५, पारनेर ९७.४५, जामखेड ९६.७०, कर्जत ९२.५०, श्रीरामपूर ९१.२३, राहाता ८८.८८, राहुरी ८३.८४, संगमनेर ८२.३५, शेवगाव ८१.९९, नेवासा ८०.२७, अहिल्यानगर ७८.२२, कोपरगाव ७७.४० टक्के.