अहिल्यानगर: राज्य सरकारच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील प्रलंबित २१ हजार ६९३ शेतकर्‍यांपैकी १० हजार १७९ शेतकर्‍यांची अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी नसल्यामुळे त्यांना फार्मर आयडी मिळालेला नाही. या शेतकर्‍यांनी तात्काळ अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी काढून घ्यावा. त्यानंतरच संबंधित शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर कर्जमाफीचा लाभ जमा होईल, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

कर्जमुक्ती योजनेतील पात्र २ लाख ३३ हजार ७११ शेतकर्‍यांची माहिती सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील १ लाख ३२ हजार ७३४ शेतकरी पहिल्या यादीत कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. यातील १ लाख ११ हजार ४१ शेतकर्‍यांची ई-केवायसी व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीसह फार्मर आयडी काढण्यात आलेला आहे. तर १० हजार १७९ शेतकर्‍यांचे फार्मर आयडी काढलेले नाही.

ॲग्रीस्टॅग नोंदणी व फार्मर आयडी नसलेल्या शेतकर्‍यांनी तात्काळ अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी काढून घ्यावा. त्यानंतरच संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर कर्जमुक्तीचा लाभ जमा करण्यात येणार आहे. यामुळे संबंधीत शतकर्‍यांनी तातडीने अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी करत फार्मर आयडी काढून घ्यावे, तसे केल्यास त्यांचे जुने कर्जमाफ होवून ते नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. यामुळे संबंधीत शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी करत फार्मर आयडी काढून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

तसेच ज्या शेतकर्‍यांनी आधार क्रमांक अमान्य अशा तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांनी त्यांच्या आधार कार्डचे स्वप्रमाणित केलेली प्रत गावातील विकास संस्थेच्या सचिवाकडे, बँकेच्या व्यवस्थापकाकडे जमा करावी. त्यानुसार तक्रारीवर जिल्हास्तरीय समितीकडून निर्णय घेऊन शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देणे सोयीचे होईल, असे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले

अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी नसणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे – अकोले ४६८, जामखेड ७०४, कर्जत ३३४, कोपरगाव ७७, नगर ५९७, नेवासा १४५४, पारनेर ८०८, पाथर्डी ४५३, राहाता २१७, राहुरी २२९, संगमनेर ७०६, शेवगाव ५९६, श्रीगोंदा ३३०४, श्रीरामपूर २३२.