अहिल्यानगर: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने आज, सोमवारी शहरातून भेसळयुक्त कुल्फीचा साठा विविध वितरकांकडून जप्त केला आहे. या कुल्फीमध्ये मनाई असणारे वनस्पती तेल (फॅट) वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या संदर्भात उत्पादक कंपनी ‘गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ या कंपनीकडून खुलासा मागवला आहे तसेच नमुनेही घेण्यात आले आहेत.

अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी ही माहिती दिली. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन ही कंपनी ‘अमुल’ या नावाने उत्पादन बाजारात आणते. अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार आईस्क्रीम कुल्फीमध्ये कोणत्याही प्रकारे वनस्पती तेल (फॅट) वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु संबंधित कंपनीमार्फत ‘अमुल’ या नावाने उत्पादित होऊन पुरवठा होत असलेल्या अनेक प्रकारच्या कुल्फीमध्ये वनस्पती तेलाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार अहिल्यानगर शहरातील अमुल कुल्फीचे वितरण करणाऱ्या आस्थापनामध्ये अन्न व सुरक्षा प्रशासनाने तपासणी केली व त्यानुसार अमुल ब्रँड कुल्फीचे नमुने घेऊन एकूण १८५६ पाकीटे कुल्फी (किंमत ५५ हजार ६८० रू.) भेसळयुक्त कुल्फीचा साठा जप्त केला.

अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी बडे व के. डी. जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील अमुल नावाने उत्पादनाचे वितरण करणाऱ्या इतर आस्थापनामध्येही तपासणी करून कार्यवाही करणार असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी बडे यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना अन्नसुरक्षा अधिकारी बडे यांनी सांगितले की, ‘फ्रोझन डेझर्ट’मध्ये खाद्यतेलाचा वापरास परवानगी असली तरी आईस्क्रीममध्ये खाद्यतेल वापरास परवानगी नाही. खाद्यतेलाच्या कुल्फीमधील वापरामुळे ट्रान्सफॅट वाढतात. ते कोलेस्ट्रॉलपेक्षाही घातक असतात. परंतु उत्पादक कंपन्या अनेकदा कुल्फीला घट्टपणा यावा, यासाठी खाद्यतेलांचा वापर करतात. अशी कुल्फी खाल्ली असता ती टाळूला चिकटते. यासाठी ग्राहकांनी कुल्फीच्या पाकिटावरील घटक वाचून कुल्फी खरेदी करावी. ‘फ्रोझन डेझर्ट’मध्ये खाद्यतेलांच्या वापरामुळे त्याची गुणवत्ता कमी असते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शीतपेय, आईस्क्रीम, कुल्फी या उत्पादनांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. रस्त्यावर बर्फाचे गोळे विक्री करणारे तसेच शहरातील चौपाट्यांवर आईस्क्रीम कुल्फीचे विक्री करणारे अनेक विक्रेते आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने या उत्पादनांचीही तपासणी सुरू केली आहे.