अहिल्यानगर: जिल्ह्यात काल, गुरुवारी एकाच दिवसात दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच व श्रीरामपूर शहरातील तरुणावर गोळीबार करण्यात आला. माजी सरपंच बचावले तर श्रीरामपूरचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आज, शुक्रवारी सकाळपर्यंत कोणाला अटक केलेली नाही.
श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून शुभम उर्फ कल्लू राजनारायण यादव याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या पाठीतून आरपार गोळी गेली. त्याला उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी पूर्णवादनगर चौकात शुभम यादव व त्याचा मित्र सागर मधुकर होगे हे दोघे दुचाकीवर बसले असताना तेथे बेलापूर येथील आरोपी अन्य साथीदारांसह आला. पूर्वीच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर शुभम यादव याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत शुभम यादव जीव वाचवण्यासाठी ‘मुळा-प्रवरा’ रस्त्यावरील एका बंगल्यात शिरला व त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही आधारे पोलीस संशयतांचा शोध घेत आहेत.
दुसऱ्या घटनेत मालुंजे (ता. संगमनेर) गावातील गोसावी फाटा परिसरात माजी सरपंचावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला तसेच तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे ( वय ४०) जखमी झाले आहेत. दोन मोटरसायकलीवरून ६ जण संदीप घुगे यांच्या घरासमोर आले.
अचानक आरडाओरडा करत गोंधळ घालत त्यांनी घुगे यांना मारण्याची धमकी दिली. त्यातील एका आरोपीने पिस्तूल काढून हवेत व घराच्या दिशेने गोळीबार करून दहशत निर्माण केली, नंतर आरोपींनी घुगे यांच्या घराच्या दरवाजावर, खिडक्यांवर तलवारीने सपासप वार करून नुकसान केले. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की त्या पाठीमागे अन्य काही कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक महेश शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पदके रवाना करण्यात आली आहेत.
