अहिल्यानगर:’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत, ढोल- ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत जल्लोषात जिल्ह्यात गणरायांचे स्वागत करण्यात आले. ‘डॉल्बी’ व ‘डीजे’ वर बंदी घातल्याने यंदा ध्वनीवर्धकांचा दणदणाट काहीसा कमी झाला होता. जिल्ह्यात एकूण ३३१२ सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
नगर शहरात भिंगारसह ३५६ सार्वजनिक ठिकाणी मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते विधिवत उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दर्शनासाठी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची झुंबड उडाली होती. मंदिरात फुलांची तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, पदाधिकारी पंडित खरपुडे, अशोक कानडे, देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज तसेच विश्वस्त उपस्थित होते. यावेळी रुद्रवंश ढोल पथकाने आपली कला सादर केली.
शहरात सायंकाळनंतर प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. त्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका पार पडल्या. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता.
गेल्या महिनाभरापासून गणेशोत्सवाचे वेध लागले होते. त्याची पूर्वतयारी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होती. बाल गणेश मंडळांच्या मिरवणुका सकाळी व दुपारपर्यंत आटोपल्या. मोठ्या मंडळांचा सायंकाळी मिरवणुका काढण्याकडे कल असतो. शहरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढणारी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाहीत तर विसर्जन मिरवणूक काढणारे बहुतांशी मंडळी प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढत नाहीत.
शहरातील बहुतांशी गणेशमूर्तीचे कारखाने कल्याण रस्त्यावर आहेत. त्यामुळे मंडळांच्या मिरवणुकाही तेथूनच निघाल्या. शिवाजीनगरचा राजा, तोफखाना तरुण मंडळ यांनी ध्वनीवर्धकाच्या आवाजात मिरवणुका काढल्या. नवनाथ संप्रदाय मंडळाने वारकरी वेशभूषेत भगवे झेंडे घेऊन मिरवणूक काढली. मोरया प्रतिष्ठानने बँड पथकाच्या साथीने मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करत मिरवणूक काढली. तेलीखुंटावरील वीर राजे युवा प्रतिष्ठानने ध्वनीवर्धक लावून मिरवणूक काढली. उपनगरातील मिरवणूक काही सायंकाळ नंतरच निघाल्या. शहरातील प्रमुख कापड बाजारात रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक मंडळांना आपल्या मिरवणुकीचा मार्ग बदलावा लागला किंवा त्या मार्गे मिरवणूक काढता आली नाही. विसर्जन मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग कापड बाजारातून जात असल्याने त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार का, असाही प्रश्न मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित करत होते.
सार्वजनिक तरुण मंडळांनी मंडप उभारून, परिसर सुशोभित करून रोषणाई करून कमानी उभारून मंगलमूर्तीचे स्वागत केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक ढोल- ताशांची पथके वाजवण्याची सुपारी घेण्यासाठी शहरात दाखल झाले होते. सजावटीच्या साहित्य विक्रीचे प्रमुख रस्त्यांवर स्टॉल उभारण्यात आले होते. पूजेचे साहित्य खरेदीसाठीही रस्त्यांवर गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.
गुलाल उधळण्याचे प्रमाण आणखी घटले
प्रतिष्ठापनेच्या निवडणुकांमधून गुलाल उधळण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होत चालल्याचे आढळत आहे. यंदाही हे प्रमाण आणखी घटले होते. हा बदल नागरिकांना सुखावणारा ठरत आहे. काही मंडळांनी पारंपारिक पद्धतीने मिरवणुका काढताना फुलांची उधळण केली.
कर्णकर्कश्श आवाज काहीसा घटला
‘डॉल्बी’, ‘डीजे’च्या कर्णकर्कश्श आवाजाचा नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून जनजागृती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कर्णकर्कश्श आवाजाच्या प्रमाणात घट झाल्याचे जाणवले. ढोल वादक पथकांची संख्याही वाढली आहे. काही मंडळांनी बँड पथके लावली होती. मात्र पूर्वीची बँजो पार्टी मिरवणुकीतून बेदखल झाली आहे.
राजकीय नेत्यांचे फलक
गणेशोत्सव राजकीय पदाधिकारी, नेत्यांना शक्तीप्रदर्शनासाठी पर्वणी ठरत आहे. त्याचा फायदाही नेत्यांकडून जाणीवपूर्वक उचलला जात आहे. मंडळाच्या परिसरात, प्रमुख रस्त्यांवर गणेश भक्तांचे स्वागत करण्याच्या नावाखाली नेत्यांनी आपली छबी झळकवणारे फलक उभारले आहेत. या फलकांवर नगरसेवक, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या छब्याही झळकवण्यात आल्या आहेत. मिरवणुकीमध्येही मंडळावर वर्चस्व असलेल्या नेत्याचे फलक घेऊन कार्यकर्ते नाचत होते.
एक गाव एक गणपती २५५ गावातून
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात खाजगी ९८, सार्वजनिक बालमंडळे १४३४, मोठी मंडळी १५२५ तर एक गाव एक गणपती २५५ गावातून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अशी एकूण ३३१२ मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. नगर शहरात ३५६ मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे.
