अहिल्यानगर: गेली बारा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने करण्यात आली. प्रतिष्ठापनेच्या दिवशी सार्वजनिक तरुण मंडळांनी डीजे, डॉल्बी सिस्टीमचा वापर टाळला होता, मात्र विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी डीजेचा कर्णकर्कश्श दणदणाट केला. नगर शहरात पोलिसांनी ८ मंडळांचे ‘डीजे’ ताब्यात घेतले. शहरातील मिरवणूक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या ठरली. जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या.
नगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते उत्सवमूर्तीची उत्थापनाची पूजा करण्यात आली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात उत्सवमूर्ती ठेवून रथ रामचंद्र खुंटावर मिरवणूक मार्गावर नेण्यात आला. सर्वात पुढे बैलगाडीत सनई चौघडा, त्यानंतर रुद्रनाद व युगंधरची ढोल पथके, धनगरी वेशातील ढोल पथक, त्यांचे मशाल व तलवार नृत्य, विधाते विद्यालयाचे झांज व लेझिम पथक तसेच विद्यार्थ्यांची सहासी नृत्य पथक प्रथम मानाच्या विशाल गणेश देवस्थानच्या रथापुढे होते. रथाच्या पुढे मिरवणूक मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी चौकात चौकात भाविकांची दर्शनासाठी, आरती करण्यासाठी झुंबड उडाली होती.
या प्रथम मानाच्या गणेशासह शहरातील मिरवणुकीत संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर तरुण मंडळ, नवरत्न तरुण मंडळ, समझोता तरुण मंडळ, नीलकमल तरुण मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, शिवसेना (शिंदे गट मंडळ) व दोस्ती तरुण मंडळ (ट्रस्ट) अशी एकूण १५ मंडळे मिरवणुकीत सहभागी होती. रामचंद्र खुंटावरून निघालेली मिरवणूक आगते बाजार, तेलीखुंट, कापड बाजार, अर्बन बँक रस्ता, नवी पेठ, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट या पारंपरिक मार्गे नेप्ती चौकातील बाळाजी बुवाच्या विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सावेडी उपनगरात स्वतंत्र मिरवणूक काढली जाते. त्यामध्ये लोकमान्य नगर मित्रमंडळ (भिस्तबाग), अहिल्यानगर मित्र मंडळ (वैदुवाडी), मोरया युवा प्रतिष्ठान (गुलमोहर रस्ता), आय लव फाउंडेशन, उपनगराचा राजा मित्रमंडळ, गोरक्षनाथ व्यायामशाळा (वैदुवाडी), शिवकृपा मित्र मंडळ (वैदुवाडी), अहिल्यादेवी विचार मंच (तपोवन रस्ता), एकदंत मित्र मंडळ (पाईपलाईन रस्ता), शंभूराजे मित्र मंडळ (वाणीनगर), जय बजरंग मित्रमंडळ (तपोवन रस्ता) व अष्टविनायक मित्रमंडळ (प्रोफेसर कॉलनी चौक) अशी तेरा मंडळे सहभागी झाली होती. या मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग रस्ता, पाईपलाईन रस्तामार्गे यशोदानगर भागातील विहिरीमध्ये करण्यात आले.
गणेशोत्सवातील प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकांमधून तरुण मंडळांनी डीजे डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट टाळला हो,ता आवाजाची मर्यादा होती. मात्र विसर्जन मिरवणुकीमध्ये त्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या मिरवणुकीतील चार व सावेडी उपनगरातून निघालेल्या मिरवणुकीतील चार अशा ८ मंडळाचे डीजे जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
मिरवणूकदारम्यान नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, आमदार, माजी खासदार यांचे छबी असलेले फलक फडकवले जात होते. अनेक ठिकाणी हिंदू धर्माच्या स्वाभिमानाविषयी आक्रमक फलक लावले गेले होते. मिरवणुकीत मंडळांनी विद्युत रोषणाई गणेशमूर्ती वाहनात ठेवल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, टेहाळणी मनोरे होते.
