अहिल्यानगर: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ‘प्लाझ्मा’ आणि ‘लेझर’ला फाटा देत परंपरेनुसार ‘सीडी’ लावणारच, अशी ठाम भूमिका गणेश मंडळांनी घेतली तर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला.

राज्य शासनाच्या संकल्पनेनुसार शहरात ‘एक मंडळ, एक पोलिस’ हा उपक्रम राबवण्यात येणार असून, देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी शहरात फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे. महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन मनपा आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. प्रास्ताविक उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले.

अशोक कानडे यांनी माळीवाडा परिसरातील अतिक्रमणे काढण्याची मागणी केली. संजय झिंजे यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहांचा मुद्दा उपस्थित केला, महापौर ज्योती गाडे यांनी त्याबाबत आश्वासन दिले. मयूर मैड आणि विक्रम राठोड यांनी प्लाझ्मा सिस्टिमला विरोध दर्शवत जुन्या पद्धतीची सीडी वापरण्याची परवानगी मागितली आणि ध्वनी प्रदूषणाच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली, मात्र सीडी जप्त न करण्याची विनंती केली. विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण होण्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली. योगेश काळे आणि अनिल मोहिते यांनी सावेडी आणि केडगावसाठी स्वतंत्र मिरवणूक मार्ग निश्चित करून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली. कमलेश जंजाळे, दिगंबर गेंट्याल, विजय गोडळकर यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.

साउंड सिस्टिम जप्तीवर स्वतंत्र बैठक

साउंड लाइट असोसिएशनचे शिवदत्त पांढरे यांनी छोटा बेस आणि टॉप लावला तरी पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न केला. अनेक मंडळांनीही ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करा, पण वाद्ये आणि सीडी जप्त करून गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका, अशी भावना व्यक्त केली. यावर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत डीजे आणि साउंड सिस्टिम जप्तीच्या कारवाईबाबत तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

महिलांसाठी फिरते स्वच्छतागृह

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, मंडप उभारणीची परवानगी ऑनलाईन पद्धतीने दिली जात आहे. मागील वर्षी परवानगी घेतलेल्या २७२ मंडळांना तीच परवानगी पाच वर्षांसाठी ग्राह्य धरून यंदाचे आदेश दिले जातील. शहरात १७ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून कापड बाजारातील रस्ता १४ सप्टेंबरपर्यंत खुला केला जाईल. खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी तीन सार्वजनिक विहिरी आणि २० ठिकाणी कृत्रिम कुंड उपलब्ध करून दिले जातील. महिलांसाठी फिरती शौचालये, भटके कुत्रे नियंत्रण आणि मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढू.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बंधनकारक

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंडळांनी साउंड सिस्टिम जरूर लावावी, परंतु ६५ डेसिबलच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे. उत्सवात पावसाची शक्यता असल्याने वीजचोरीसारखे प्रकार टाळावेत. मंडळांनी नशामुक्त अभियानात सहभागी होऊन समाज प्रबोधनावर भर द्यावा.

एक प्रभाग- एक गणपती संकल्प करा

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासकीय यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणने मिरवणूक मार्गावरील विजेच्या लटकत्या तारांबाबत १० सप्टेंबरपर्यंत ठोस उपाययोजना करावेत. प्लाझ्मा आणि लेझर न लावण्याचा निर्णय मंडळांनीच घेतल्याने तो पाळावा. महापालिकेकडून रस्ते, खड्डे आणि शौचालयांबाबत काम सुरू असून सावेडी, भिंगार आणि केडगावमध्येही आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. ‘एक वॉर्ड एक गणपती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देऊन परंपरा जपत पर्यावरणपूरक आणि नशामुक्त अहिल्यानगरचा संदेश गणेशोत्सवातून द्यावा.