अहिल्यानगर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या असतानाच जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ८४३ ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण अंतिम होऊनही या निवडणुका लांबणीवरच पडलेल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीच्या कार्यक्रमाकडे आता गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान ३३ ग्रामपंचायतींमधील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्याने तेथे फेरआरक्षण काढण्यात आले आहे.

संगमनेरमधील ९४, पारनेर ८८, पाथर्डी ७९, श्रीगोंदे ६२, अहिल्यानगर ६०, नेवासे ५९, कर्जत ५५, अकोले ५२, जामखेड ४९, शेवगाव ४८, राहुरी ४४, कोपरगाव २९, श्रीरामपूर २७ व राहता २५ अशा एकूण ८४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रमाकडे लक्ष लागलेले आहे. सध्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. प्रशासकांच्या आर्थिक अधिकारावरही न्यायालयीन आदेशाने मर्यादा आणल्या गेल्या आहेत.

जिल्हा प्रशासनातील सूत्रानुसार येत्या महिनाअखेरीपर्यंत मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे असली तरी सध्या मतदार यादीची विशेष पुनरिक्षण मोहीम (एसआय आर) सुरू असल्याने त्याबद्दलही गाव पुढाऱ्यांमध्ये संदीग्धता आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत विविध टप्प्यांवर मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या अशा एकूण ८४३ ग्रामपंचायतींची प्रभाग आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

जाहीर केलेल्या आरक्षणावरील हरकतींचा निपटारा करून १० जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण अंतिम केले. आता संबंधित ग्रामपंचायतींच्या मतदार यादी कार्यक्रमाची प्रतिक्षा आहे. असे असले तरी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेल्या आठवड्यात आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. यावर एकूण १५७ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जुलैला अंतिम निर्णय घेत १० जुलैला जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतीचे प्रभाग आरक्षण निश्चित केले. ३३ ग्रामपंचायतींच्या आरक्षणात बदल करण्यात आले आहेत. या ठिकाणचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नियमानुसार तेथे फेरआरक्षण काढून ते १३ जुलैला अंतिम करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली. यामध्ये संगमनेरमधील ३, कर्जत १८, राहुरी ४ व श्रीरामपूरमधील ८ अशा एकूण ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.