अहिल्यानगर: आरोग्य विभागाच्या वतीने घरोघर सुरू असलेल्या सर्वेक्षणातून उच्च रक्तदाबाचा विकार असलेले १ लाख ३९ हजार ५११ तर मधुमेहाचे ८० हजार ८७२ नवीन रुग्ण गेल्या वर्षभरात जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात उच्च रक्तदाबाचा विकार असलेले एकूण ३ लाख ३५ हजार ४०६ तर मधुमेहाचे एकूण १ लाख ९८ हजार १२० रुग्ण आढळले आहेत.

मात्र हे प्रमाण देशाच्या सरासरीच्या तुलनेत कमी असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात सध्या राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे गाव- आरोग्यसंपन्न गाव’ या मोहिमेत ३० वर्षावरील प्रत्येक महिला व पुरुषाचे घरोघर जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच सरकारी आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण, खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण यांचीही माहिती घेतली जात आहे.

या सर्वेक्षणातून उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा) लक्षणांची माहिती घेतली जात आहे. त्यातून त्यांना ‘तीशीचा पल्ला, उपचार अन् सल्ला’ उपक्रम राबवला जात आहे. या सर्वेक्षणातूनच तोंडाचा कर्करोग असलेले ३४२, स्तनाचा कर्करोग असलेले १२१ व गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कर्करोग असलेले १३५ रुग्ण आढळून आले आहेत. हा १०० दिवसांचा उपक्रम १० डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह महापालिका व नगरपालिका हद्दीमध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. लक्षणे आढळलेल्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून नियमित उपचार घेण्याची सूचना केली जात आहे.

तीस वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी

शास्त्रीय पद्धतीने झालेले विविध अभ्यास व संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आढळलेली उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांची संख्या देशाच्या सरासरीच्या तुलनेत कमी आढळली आहे. तरीही अद्याप काही रुग्णांची तपासणी होणे, सर्वेक्षण सुरू आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही माहिती घेतली जात आहे. तीस वर्षावरील सर्व महिला व पुरुषांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन आहे.  -डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद

बदलती जीवनशैली

बदलेली जीवनशैली, मानसिक ताण-तणाव, बैठे काम, आहार या माध्यमातून उच्च रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.